पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी व्हावी आ. डॉ. संजय कुटे यांची विधानसभेत मागणी...
जळगाव जा प्रतिनिधी...
जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ.संजय कुटे यांनी बुधवारी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात स्व. पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी जोरदार आवाज उठवला. सभागृहात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, देशमुख यांचा मृत्यू आत्महत्या होती की घातपात, याबाबत कुटुंबीयांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी, एसआयटी, सीबीआय किंवा उच्च न्यायाधीशांच्या न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी त्यांनी सरकारकडे केली.स्व. पंकज देशमुख हे आमदार संजय कुटे यांचे बालमित्र व अत्यंत जवळचे सहकारी होते. ३ मे रोजी बऱ्हाणपूर रोडवरील त्यांच्या शेतात मृतदेह आढळून आल्यापासून परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक तपासानंतर हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले, परंतु त्यांची पत्नी सुनीता देशमुख यांनी ही सरळसरळ हत्या असल्याचे ठाम मत मांडले आहे.याप्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत स्थानिक पातळीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निवेदने दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार खामगाव दौऱ्यावर असताना देशमुख कुटुंबियांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधून निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार संजय कुटे यांनी २ जुलै रोजी विधिमंडळात हा मुद्दा ठामपणे मांडत, 'हा केवळ मृत्यू नाही, तर सत्य शोधण्याची वेळ आहे,' असे स्पष्ट केले.या प्रकरणातील सत्य जनतेसमोर यावे, दोषींना शिक्षा व्हावी व कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी ही चौकशी अत्यावश्यक आहे. असा सभागृहात आवाज उठवून आमदार कुटे यांनी लोकभावनांना वाचा फोडली आहे.
