अकोट नगरपरिषदेच्या अवाजवी करवाढीविरोधात शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना नगरपरिषद मुख्याधिकारी मार्फत निवेदन...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट नगरपरिषद हद्दीतील रहिवासी व मालमत्ता धारकांवर करण्यात आलेल्या अवाजवी कर आकारणीविरोधात शिवसेनेच्यावतीने आज मा.उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांना नगरपरिषद अकोट मुख्याधिकारी यांचे माध्यमातून निवेदन देण्यात आले.अकोट नगरपरिषदेने २०२५-२६ ते २०२८-२९ या कालावधीतील चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकनाच्या नोटिसा नागरिकांना उशिराने वितरित केल्या असून, हरकती नोंदविण्यासाठी अपुरा कालावधी देण्यात आल्याचा नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.कर दरात अवाजवी वाढ,दुरुस्ती खर्चाबाबत अस्पष्टता,करयोग्य मूल्याचे अनावश्यक वाढीव मूल्यांकन, शिक्षण कराचा दुहेरी समावेश,खुल्या प्लॉट्सवरील अन्यायकारक कर आणि वृक्षकराच्या खर्चाचा खुलासा नसल्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनीष रामाभाऊ कराळे तसेच तालुका प्रमुख प्रकाश गीते यांनी नागरिकांच्या वतीने निवेदनाद्वारे पुढील मागण्या मांडल्या.
अवास्तव करण्यात आलेली करवाढ रद्द करण्यात यावी.कर आकारणीची पूर्ण प्रक्रिया नव्याने व पारदर्शक पद्धतीने राबवण्यात यावी.या प्रक्रियेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.या निवेदनाद्वारे त्यांनी स्पष्ट केले की, “अकोट शहरातील नागरिकांवर अन्यायकारक कर लादण्यात आलेला असून,आम्ही शिवसेनेच्या वतीने जनतेच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. करवाढीची राबवलेली ही संपूर्ण प्रक्रिया रद्द झाली पाहिजे. निवेदन देतेवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनीष रामाभाऊ कराळे,तालुका प्रमुख प्रकाश गीते,शहर प्रमुख प्रसन्न जवंजाळ,मनीष राऊत,दिवाकर भगत,यश गावंडे,विशाल कोडापे,अंकुश कहार यांच्यासह अनेक शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.