नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत पळशी सुपो येथील महिलांना शेतीशाळेच्या माध्यमातून मिळतात आधुनिक शेतीचे धडे...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अंतर्गत तालुक्यातील सुमारे 18 गावांचा समावेश झाला असून त्यामध्ये पळशी सुपो या गावाचा सुद्धा समावेश आहे. सदर प्रकल्पामध्ये गावाची निवड झाल्यापासून वेगवेगळ्या बैठकांच्या तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावामध्ये प्रकल्पाविषयी लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने जनजागृती कृषी विभाग जळगाव जळगाव जामोद यांच्या वतीने करण्यात येत आहे, प्रभात फेरी, मशाल फेरी आणि शिवार फेरी यांच्या माध्यमातून गावाचे पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले असून गावाचा सूक्ष्म नियोजन आराखडा सुद्धा तयार करण्यात आला आहे. प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून महिलांच्या शेती शाळेचे दर पंधरवड्याला आयोजन करण्यात येते, कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, परंतु त्यांच्या सहभागाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड नाही ती जोड देण्यासाठीच शासनाने खास करून ना. दे. कृ. स. प्रकल्पामधील गावांमध्ये महिलांची शेती शाळा घेण्याचे सांगितले आणि त्यानुसार पळशी सुपो येते सोयाबीन पिकाची शेती शाळा सहाय्यक कृषी अधिकारी कुमारी एस पी गवळी या दर पंधरवड्याला आयोजित करतात. शेती शाळेमध्ये एकूण सहा वर्ग असून त्यापैकी तीन वर्ग हे झाले असून सोयाबीन पीक लागवडीपासून ते अंतिम उत्पादन, मूल्यवर्धन कसे करता येईल याबाबतीत वर्गनिहाय उपस्थित महिलांना शेती शाळेच्या वर्गामध्ये प्रशिक्षित करण्यात येते, प्रत्यक्ष सोयाबीनच्या प्रक्षेत्रावर जाऊन सोयाबीन पिकाचे बीज प्रक्रिया, लागवड तंत्रज्ञान, सरी वरंबा लागवड पद्धत तसेच सोयाबीन पिकावर येणाऱ्या विविध रोग व किडी त्यांची ओळख त्यांची नुकसान करण्याची पद्धती आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे याबद्दल वर्गनिहाय मार्गदर्शन आणि चर्चा करण्यात येते. त्याचबरोबर सोयाबीन पिकाचे एकात्मिक सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक खत व्यवस्थापन ,एकात्मिक तन व्यवस्थापन अशा विविध संकल्पना ची माहिती प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे आणि सादरीकरणाद्वारे उपस्थित महिलांकडूनच शेती शाळेच्या वर्गामध्ये केली जाते. शेती शाळेच्या वर्गाला तज्ञ प्रशिक्षक म्हणून उप कृषी अधिकारी कृष्ण शिंदे हे मार्गदर्शन करतात. शाळेला मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग हा दिसून येतो आणि वर्गनिहाय त्यांचे उपस्थितीत सुद्धा वाढलेली दिसून येते , शेती बद्दल नवनवीन माहिती मिळत असल्यामुळे शाळेमध्ये सहभागी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतो. सदर शेती शाळा आहे उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव, बाळासाहेब व्यवहारे आणि तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये घेण्यात येत आहे.