वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करून मृतदेह पूर्णा नदीत फेकला..!संग्रामपूर तालुक्यातील धक्कादायक घटना,सुनेच्या तक्रारीवरून तामगाव पोलिसांची कारवाई ..! आरोपी मुलास २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी...!
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथे मुलाने कुऱ्हाडीने वार करून जन्मदात्या वडिलांची निघृण हत्या केली आणि मृतदेह पोत्यात भरून पूर्णा नदीत फेकून दिल्याची समाजमन सुन्न करणारी घटना १९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सुनेच्या तक्रारीवरून आरोपी मुलगा शिवाजी रामराव तेल्हारकर याच्याविरुद्ध तामगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, संग्रामपूर न्यायालयात हजर केल्यानंतर २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.बोडखा येथील रहिवासी रामराव उत्तम तेल्हारकर (वय ६९) यांची हत्या त्यांचा मुलगा शिवाजी याने केली.ताटात उष्टे अन्न ठेवल्याचे कारण आणि वडिलांनी वारंवार कामचुकारपणाबद्दल टोमणे मारल्याने रागाच्या भरात शिवाजीने ही कृती केली. त्याने स्वयंपाकघरात कुऱ्हाडीने वडिलांच्या गळ्यावर वार करून त्यांना ठार केले. त्यानंतर, पुरावा नष्ट करण्यासाठी शिवाजी आणि त्याच्या मुलाने मृतदेह दोन रिकाम्या खताच्या पोत्यात भरून खिरोडा पुलावरून पूर्णा नदीत फेकून दिला. अद्याप मृतदेह सापडलेला नाही, तामगाव पोलिसांचा शोध सुरू आहे. रामराव तेल्हारकर यांनी मुलाला तू घराकडे लक्ष देत नाहीस, काम करीत नाहीस असे टोमणे मारले होते. याचबरोबर ताटात उष्टे अन्न ठेवल्यावरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला. या वादातूनच शिवाजीने कुऱ्हाडीने हल्ला करून वडिलांना गंभीर जखमी केले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, समाजात संतापाची लाट पसरली आहे.सुनेची तक्रार नंतर तामगाव पोलीसांची कारवाई,आरोपीच्या पत्नी, योगिता शिवाजी तेल्हारकर यांनी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तोंडी अहवालावरून तामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास ठाणेदार राजेंद्र पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. १९ ऑगस्ट रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात आले. संग्रामपूर न्यायालयाने त्याला २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
