'रुबल'फाउंडेशनच्या पुढाकाराने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील तज्ज्ञांचे करिअर मार्गदर्शन...
आर सी २४ न्युज नेटवर्क...
ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, प्रेरणा व स्पर्धा परीक्षांची तयारी यासाठी रुबल फाउंडेशनच्या करिअर अँड रुरल टॅलेंट सेंटर तर्फे सातत्याने उपक्रम राबवले जात आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये संस्थेने दोन महत्त्वपूर्ण ऑनलाईन सत्रांचे आयोजन केले, ज्यामध्ये पुण्यातील तज्ञ वक्त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
२१ सप्टेंबर २०२५ रोजी “वृत्तपत्र वाचन आणि स्पर्धा परीक्षेतील महत्त्व” या विषयावर पुण्यातील अभ्यासक मानसी काळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी वृत्तपत्र वाचनाची पद्धत, महत्त्वाच्या बातम्यांची निवड, नोट्स लेखनाची गरज आणि रोजच्या वाचनाचा सवयीवर होणारा परिणाम यावर सविस्तर चर्चा केली. “न्यूज हे फक्त वाचायचे नसते, तर समजून घेऊन विश्लेषण करणे ही खरी तयारी असते” हा त्यांचा संदेश विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरला.२७ सप्टेंबर २०२५ रोजी “पोलीस उपनिरीक्षक परीक्षा: स्वरूप आणि शालेय जीवनापासून तयारी” या विषयावर योगेश खडे (पोलीस उपनिरीक्षक, पुणे) यांनी मार्गदर्शन केले. परीक्षेची रचना, अभ्यासक्रम, वेळेचे नियोजन तसेच शालेय जीवनातील शिस्त, नियमित अभ्यास आणि चिकाटी यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनीही या सत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सातवीतील दिव्या अमोल चवटकार हिने सांगितले की “या सत्रातून वृत्तपत्र कसे वाचावे, कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे आणि त्याचा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी कसा फायदा होतो हे शिकता आले.” तर आठवीतील प्रणाली विजय गवई हिने व्यक्त केले की “पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या सत्रातून पहिल्यांदाच अशी माहिती मिळाली आणि अशा परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली.”या उपक्रमाबाबत डॉ. कुलदीपसिंह राजपूत (संस्थापक संचालक, रुबल फाउंडेशन) यांनी सांगितले की, “आमचे ध्येय म्हणजे ग्रामीण-आदिवासी युवकांमध्ये करिअरची नवी उमेद व आत्मविश्वास निर्माण करणे. पुण्यातील वक्त्यांचे अनुभव व मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. रुबल फाउंडेशन अशा उपक्रमांद्वारे “रूरल भारत को बल देना” हे आपले ध्येय साध्य करण्यासाठी कटिबद्ध आहे."