देऊळघाट येथील वार्ड क्रमांक १ मध्ये रस्ता, नाली व वीजबत्तीच्या मागणीसाठी महिलांचा पंचायत समितीत बैठा सत्याग्रह....


 
देऊळघाट येथील वार्ड क्रमांक १ मध्ये रस्ता, नाली व वीजबत्तीच्या मागणीसाठी महिलांचा पंचायत समितीत बैठा सत्याग्रह....

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

देऊळघाट (ता. बुलडाणा) येथील ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक १ मधील नागरिकांनी मागील दहा ते पंधरा वर्षांपासून मुलभूत सुविधांच्या मागण्या सतत केल्या असूनही ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे स्थानिक महिलांनी अखेर पंचायत समिती बुलडाणा येथे बैठा सत्याग्रह आंदोलन छेडले.सदर वार्डामध्ये मानवी वस्ती असली तरी रस्ता, नाली, सीमेंट रस्ता तसेच वीजबत्ती यांचा पूर्णपणे अभाव आहे. नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय देऊळघाट येथे लेखी व तोंडी मागण्या केल्या होत्या, मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. या निष्क्रिय कारभाराला कंटाळून सौ. शहेनाजबी शे. सलीम यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला पंचायत समिती बुलडाणा येथे हजर राहून आपली मागणी लेखी स्वरूपात सादर केली.महिलांनी या आंदोलनादरम्यान ग्रामपंचायतीच्या सरपंचावर देखील संताप व्यक्त केला. "सरपंच आम्हाला आमच्या पतींची नावे विचारतात, आम्हाला ओळखत नाहीत का? इतकी वर्षे आम्ही इथे राहत असूनही सरपंचांना आमची माहिती नाही, हे ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेचेच द्योतक आहे," असे महिलांचे म्हणणे आहे.या निवेदनात विशेष नमूद करण्यात आले आहे की, "आम्हाला तात्काळ रस्त्याचे खडीकरण करून सीमेंट रस्ता, नाली बांधकाम, तसेच वीजबत्तीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा आम्हाला पुन्हा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल."महिलांनी प्रशासनाला पंधरा दिवसांचा ठोस मुदत देत आताच काम सुरू करण्याची मागणी केली असून याबाबत उलट टपाली अहवाल पंचायत समिती बुलडाणा येथे सादर करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.या आंदोलनामुळे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून लवकरच संबंधित कामे हाती घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post Next Post