स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार – जिल्हाध्यक्ष सागर समदूर...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात जळगाव जामोद येथील विश्रामगृहात जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचे अध्यक्षस्थान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सागर समदूर यांनी भूषविले. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून पक्षाचे विदर्भ सचिव गणेश मानकर तर प्रमुख अतिथी म्हणून घाटावर जिल्हाध्यक्ष कारभारी गायकवाड उपस्थित होते.बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा सहसचिव हिम्मत चव्हाण यांनी केले. मार्गदर्शन करताना गणेश मानकर यांनी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन केले.अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष सागर समदूर म्हणाले की, जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका पक्ष स्वबळावर लढणार आहे. यावेळी त्यांनी जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान शासनाने तातडीने पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी केली. तसेच गायरान व पडीत जमिनीवर अनेक वर्षांपासून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे द्यावेत, अवैध शिकवणी केंद्रांवर कारवाई करावी, घरकुल योजनेअंतर्गत बेघरांना त्वरित घरे द्यावीत, शेतकरी व शेतमजुरांना रोजगार मिळावा यासाठी विकासकामे त्वरीत सुरू करावीत, अशा ठळक मागण्या त्यांनी केल्या.या बैठकीस राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा सरलाताई ससाने, शहराध्यक्ष विजय राजपूत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमर तायडे, राम मैसे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन राम मैसे यांनी केले. जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व स्थानिक कार्यकर्त्यांची या बैठकीत प्रामुख्याने उपस्थिती होती.