💥अखेर "त्या मुजोर" ठेकेदारावर गुन्हे दाखल...ठेकेदाराच्या ढिसाळ कामामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्य मार्गावरील वाहतूक पुन्हा बंद....
हिवरखेड प्रतिनिधी...
अकोट हिवरखेड जळगाव जामोद राज्यमार्गावरील (हिवरखेड आणि खंडाळा फाटा) या दोन रखडलेल्या पुलाच्या कामामुळे अत्यंत महत्त्वाचा असलेला हा राज्यमार्ग वारंवार बंद पडत असून 16 सप्टेंबर रोजी पुलाच्या अपूर्ण बांधकामामुळे आणि पर्यायी पुलाचा संपूर्ण भराव वाहून गेल्याने राज्यमार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली. तसेच या प्रकरणाच्या वास्तविक बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकाराला वारंवार धमकावणे, अत्यंत अश्लील शिवीगाळ करणे, आणि पत्रकाराला अत्यंत गंभीर स्वरूपाच्या धमक्या देणे अश्या आरोपाखाली ठेकेदार राजेश देशमुख यांच्यावर हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये अखेर गुन्हे दाखल झाले आहेत.अकोट हिवरखेड राज्य मार्गावरील या दोन रखडलेल्या पुलांच्या कामामुळे अनेकदा वाहतूक विस्कळीत होत असून अनेक अपघात होत आहेत. यामध्ये एका आदिवासी युवकाला प्राण सुद्धा गमवावे लागले. त्याची नोंद हिवरखेड पोलीस स्टेशनला आहे. या पुलाच्या वस्तुनिष्ठ बातम्या प्रामाणिकपणे पत्रकाराने लावली असता त्या पुलाचे बांधकाम करणाऱ्या सबंधित मुजोर व उद्धट ठेकेदाराने वास्तविक बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकाराला भ्रमध्वनीवरून आणि प्रत्यक्ष पुला जवळ बोलावून वारंवार अत्यंत अश्लील शिवीगाळ केली आणि गंभीर स्वरूपाच्या धमक्या दिल्या. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची सुद्धा धमकी दिली. त्यामुळे या घटनेचा हिवरखेड येथील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला होता. व संबंधित मुजोर ठेकेदाराविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आदिवासी युवकाच्या मृत्यूसाठी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी हिवरखेड पोलीस स्टेशन येथे पत्रकार बंधूंमार्फत निवेदन देण्यात आले होते.आता पोलीस आणि प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कडून या उद्धट ठेकेदारावर कोणती कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
--पुलाचे काम दुसऱ्या कंत्राटदाराकडून युद्ध स्तरावर करवून घ्यावे--
सदर ठेकेदाराला पुलाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करता आले नाही. एवढेच नव्हे तर मुदतवाढ देऊन सुद्धा करता आले नाही. या प्रकरणाच्या वस्तुनिष्ठ बातम्या प्रकाशित होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदारावर फक्त पाचशे रुपये रोज प्रमाणे दंड आकारण्यात यावा असा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यामुळे जवळपास प्रत्येकी दोन दोन कोटीच्या दोन पुलाचे काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराची पाठराखण केली जात असल्याचे दिसत असून आता सदर ठेकेदारावर गुन्हे दाखल झाल्याने आणि या पुलाच्या कामामुळे वाहतूक वारंवार बंद पडत असल्याने या पुलाचे काम लवकर करू शकणाऱ्या दुसऱ्या कंत्राटदाराला देऊन युद्ध स्तरावर हे काम पूर्ण करून घ्यावे अशी मागणी या मार्गावरून प्रवास करताना त्रस्त झालेल्या प्रवाशांनी केली आहे.
अर्जुन खिरोडकार,
पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई झालीच पाहिजे.
वास्तविक बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकाराला वारंवार धमकावणे, अत्यंत अश्लील शिवीगाळ करण, अत्यंत गंभीर स्वरूपाच्या धमक्या देणे अश्या आरोपाखाली ठेकेदार राजेश देशमुख यांच्यावर हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये अखेर गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु, त्याच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसारच कार्यवाही झाली पाहिजे अशी सर्व पत्रकार बांधवांची एकमुखी मागणी असून सदर मागणीच्या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ स्तरावर सुद्धा देण्यात येणार आहेत.