सारोळा पीर ते रोहिणखेड शेत रस्ता पन्नास वर्षापासून प्रलंबित.शेती पडीत पडल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकूळीस..ग्राम स्वराज्य समिती,आझाद हिंद शेतकरी संघटनेने दिला बैलगाडी मोर्चाचा इशारा...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
मोताळा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या सारोळा पीर ते रोहिणखेड रस्त्यासाठी ग्राम स्वराज्य समिती आणि आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने मोताळा तहसीलदार आणि भूमी अभिलेख कार्यालयाला 9 सप्टेंबरला तिसरे स्मरण पत्र देत रस्ता तत्काळ सुरू करण्याची मागणी केली.सारोळा पीर ते रोहिणखेड दहा किलोमीटरचा शेत पांदन रस्ता मागील पन्नास वर्षापासून नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरतोय. असंख्य शेतकऱ्यांना शेतातील मशागत करणे दुरापास्त झाले आहे. रस्त्या अभावी शेतामध्ये बैलगाडी अवजारे ने आण करणे शक्य नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पडीत पडलेली आहे. तर असंख्य शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी मेटाकुळीस आले आहे. या अनुषंगाने सारोळा पीर रोहिणखेड, फर्दापूर ग्राम स्वराज्य समितीच्या वतीने जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी, महसूल, तहसीलदार, भूमि अभिलेख व संबंधितांना नियमानुसार निवेदन देत रस्ता अतिक्रमण मुक्त करून वहिवाटीसाठी सुरू करण्याची मागणी यापूर्वी वारंवार करण्यात आलेली आहे. परंतु अद्याप पर्यंत कोणतीही ठोस कारवाई संबंधित प्रशासनाने केली नाही. त्यामुळे 9 सप्टेंबरला ग्राम स्वराज्य समिती आणि आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोताळा तहसीलदार हेमंत पाटील आणि भूमि अभिलेख अधिकारी यांच्यासोबत मॅरेथॉन बैठक घेत चर्चा केली आहे. निवेदनाच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करून रस्ता अतिक्रमन मुक्त न झाल्यास बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा सुद्धा यावेळी निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, राम व्यवहारे, संजय एंडोले, सुशांत पाटील,कमलाकर व्यवहारे, संदेश जाधव,प्रवीण जाधव,प्रशांत जाधव,शंकर लोखंडे, बळीराम जाधव,सुरेश जाधव, पुंडलीक पाटील, भीमराव जाधव,आकाश जाधव, शेषराव जाधव,चेतन व्यवहारे, अर्जून व्यवहारे, ज्ञानेश्वर व्यवहारे, दयाराम जाधव,प्रभात जाधव, वासुदेव जाधव,संजय जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी, ग्राम स्वराज्य समिती मोताळा, आझाद हिंद शेतकरी संघटना, आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.