अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी....
बुलडाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलिसांनी धडक कारवाईत 5 देशी बनावटीच्या पिस्तुलांसह दोन अतिरिक्त मॅग्झीन, 16 जिवंत काडतुसे, एक कार, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 7 लाख 33 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील दोन तरुणांना अटक करण्यात आली असून एक शस्त्र पुरवठादार आरोपी फरार आहे.गोपनीय माहितीच्या आधारे सोनाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी पथकासह दिनांक 27ऑक्टोबर रोजी सापळा रचून टुनकी ते सोनाळा रोडवरून टुनकीकडून येणारी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डीझायर क्रमांक एमपी 20 सीजी 1697 गाडी थांबवून तपासणी केली असता वाहनातून 5 देशी बनावटी पिस्तुल, 2 मॅग्झिन, 16 जिवंत काडतुसे,यासह अन्य साहित्य असा एकूण 7 लाख 33 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईत मोहम्मद नफिज अकिल अली वय २४ मोहम्मद उबेद रझा मोहम्मद अल्फाज वय २१ दोघेही राहणार चांदामेठा, तालुका परासिया जिल्हा छिंदवाडा (मध्य प्रदेश) असे आरोपीची नावे आहेत. तसेच पिस्तुल पुरवणारा एक अनोळखी इसम सध्या फरार आहे. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन सोनाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात सोनाळा ठाणेदार चंद्रकांत पाटील व सहकाऱ्यांनी केली आहे.
