काजलडोह गावात अस्वलाचा दुसरा हल्ला; ३३ वर्षीय पंकज उईके गंभीर जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशत...


 काजलडोह गावात अस्वलाचा दुसरा हल्ला; ३३ वर्षीय पंकज उईके गंभीर जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशत...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत येणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील काजलडोह गावात मंगळवार पुन्हा एकदा अस्वलाने हल्ला केला. यात गावातील ३३ वर्षीय पंकज जोंन्दु उईके हे गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसात गावात अस्वलाकडून घडलेली ही दुसरी घटना असून, वनविभागाने आतापर्यंत संबंधित अस्वलाला पकडण्यात अपयश आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आणि दहशतीचे वातावरण आहे.पंकज उईके हे आपल्या शेतात काम करत असताना अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. अस्वलाने पंकज यांच्या पाठीवर गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी धाव घेतल्याने अस्वल जंगलाकडे पळून गेले. ग्रामस्थांनी त्वरित पंकज यांना काटकुंभ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.घटनेची माहिती मिळताच गावाचे सरपंच राजेश कवडे, विनायक कवडे संजीव कुमरे,व  गावातील नागरिक तसेच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र वनविभागाच्या पथकाकडे अस्वल पकडण्यासाठी लागणारे भूलतडिपाचे साहित्य किंवा पिंजरे नव्हते, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.ग्रामस्थांनी वनविभागावर निष्क्रियतेचा ठपका ठेवत त्वरित अस्वलाला रेस्क्यू करण्याची मागणी केली आहे.गावात सलग दुसऱ्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून, शेतात काम करणे, जनावरे चारणे यासारख्या दैनंदिन कामांनाही भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

_______________________________

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र “आम्ही टीम पाठवली आहे, लवकरच अस्वलाला पकडले जाईल,” असे सांगितले आहे.

_______________________________

प्रतिक्रिया

 “गेल्या महिन्यातही अस्वलाने एका व्यक्तीवर हल्ला केला होता. तेव्हा वनविभागाने फक्त आश्वासने दिली, पण आजपर्यंत ते अस्वल पकडले नाही. मंगळवारी पुन्हा जीवघेणा हल्ला झाला आहे. रात्री-अपरात्री अस्वल गावालगत फिरत असल्याने लहान मुले व महिलांना घराबाहेर पडणेही धोकादायक झाले आहे. गावकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. वनविभागाने तात्काळ अस्वल पकडून गावकऱ्यांच्या जीविताची सुरक्षा करावी, ही आमची आग्रहाची मागणी आहे.

Previous Post Next Post