जळगाव जामोद प्रतिनिधी...
तालुक्यातील मूळचे सुनगाव येथील व सध्या पुणे येथे भारतातील प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व अध्यापकपैकी एक असलेले प्रा.अजिंक्यसिंह गोविंदसिंह राजपूत यांना यावर्षीचा ऐतिहासिक राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला.पुणे येथील कोथरूड मधील गांधी भवन हॉलमध्ये दिनांक 5 डिसेंबरला संध्याकाळी,गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य' आयोजित एका मोठ्या समारंभात हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी या ठिकाणी सुरुवातीला भारत नाट्यम चे नृत्य सादर झाले त्यानंतर पारंपरिक आखाडा चे प्रात्यक्षिक प्रदर्शन करण्यात आले.त्यानंतर प्रमुख पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली.इतिहास अभ्यास व अध्यापन क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी या पुरस्कारसाठी अजिंक्यसिंह यांना निवडण्यात आले.ते म्हणाले मागील दहा वर्षापासून पुणे ,दिल्ली ,ठाणे इत्यादी ठिकाणी ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकवत असतात.सोशल मीडियावर सुद्धा अजिंक्यसिंह यांना मोठा फॉलोवर वर्ग आहे.
ट्रस्टचे संस्थापक श्रीमंत शिवाजीराजे भोसले (तंजावर )यांच्या प्रेरणेने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांच्या उपस्थितीत चंदू चॅम्पियन फेम श्री मुरलीकांत पेटकर (भारताचे पहिले प्यारा ओलंपिक सुवर्णपदक विजेते) यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार अजिंक्यसिंह यांना प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल दादा मालुसरे,सरनोबत अमितदादा गाडे पाटील, श्रीमंत दीपक राजे शिर्के, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.अजिंक्यसिंह यांनी महाराष्ट्राच्या संस्कृती व इतिहासाचा वारसा त्याचप्रमाणे मराठ्यांचे पराक्रम याविषयी तथ्याधारित अभ्यास करून विद्यार्थ्यांसमोर मांडले,आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम इतिहास व स्वराज याविषयी प्रेम जागवले,त्याचप्रमाणे गड किल्ल्यांचे संवर्धन व महत्त्व याविषयी जनजागृती केली.इतिहासाच्या माध्यमातून व्यक्तित्व विकास नेतृत्व गुण आणि राष्ट्रप्रेम यांचा प्रचार केला, त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा सातत्यपूर्ण प्रसार केला या सर्व मूल्यांना व कार्याला गृहीत धरून प्रा.अजिंक्यसिंह यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. सुनगाव सारख्या छोट्याशा गावातून येऊन इतका प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व जळगाव जामोद तालुका व अजिंक्यसिंह यांचे विद्यार्थी व मित्र गण यांच्यामधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.आपल्या यशाचे श्रेय ते आपले गुरुजन व कुटुंबीयांना देतात.
