जळगांव जामोद (प्रतिनिधी):
दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी रात्री रसूलपूर ग्रामपंचायत अंतर्गत परिसरात झालेल्या तुफानी पावसाने आणि जोरदार वादळी वाऱ्याने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सोहेल अली खान यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवकांना निवेदन देण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे २७ जानेवारीच्या रात्री आलेल्या वादळाने उभ्या पिकांची नासाडी केली. यामध्ये प्रामुख्याने गहू, मका, हरभरा, भाजीपाला आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेली पिके जमिनीदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, अनेक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.या गंभीर परिस्थितीची दखल घेत दि. ३० जानेवारी २०२६ रोजी शसोहेल अली खान यांच्या हस्ते ग्रामसेवक, ग्रामपंचायत रसूलपूर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन ग्रामसेवकांमार्फत तहसीलदार साहेबांकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
बाधित क्षेत्राचे तातडीने शासकीय पंचनामे करण्यात यावेत.शासन निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मंजूर करावी.शेतकऱ्यांचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी तातडीने मदत निधी उपलब्ध करून द्यावा.निवेदन सादर करताना यावेळी देविदास वानखेडे, शफिउल्ला खान, जफर खान, याहिया पटेल, कलीम मिर्झा, वहाब खान, उस्मान खान, कासम तडवी, शेषराव वाघ, समाधान वानखेडे, जावेद तडवी, अझहर पटेल, मोहम्मद शहजाद, अझीम सरदार, समद भाई, शराफत पटेल, साबू तडवी, सदेव हिवराडे, सय्यद नदिम यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मदतीची आर्त हाक दिली आहे.
