जळगाव जामोद(प्रतिनिधी):
तालुक्यातील सुनगाव येथील कुणबी समाज पंचायतच्या मालकीच्या जागेवर गावातील काही नागरिकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कुणबी समाज पंचायतचे व्यवस्थापक विनोद सुखदेव इंगळे यांनी जळगाव जामोदच्या तहसीलदारांकडे लेखी तक्रार देऊन अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे.तक्रारदार विनोद इंगळे यांनी दिलेल्या अर्जानुसार, मौजा सुनगाव येथील नझुल शीट नं. ५, प्लॉट नं. ७२९ (क्षेत्रफळ २५६२.२० चौ.मी.) ही जागा शासकीय अभिलेखाप्रमाणे, चौकशी पंजीनुसार आणि सिटी सर्व्हे नकाशानुसार कुणबी समाज पंचायतच्या मालकीची आहे. या जागेचे व्यवस्थापन विनोद इंगळे यांच्या कुटुंबाकडे असून, त्यांचे आजोबा कै. लक्ष्मण माधव इंगळे यांचे नाव या जागेवर कायम आहे.आजोबांच्या निधनानंतर या स्थितीचा फायदा घेत गावातील काही नागरिकांनी या जागेवर असलेले जुने कुंपण तोडून टाकले. तसेच, विनोद इंगळे यांना दमदाटी करून त्या जागेवर नवीन तारेचे कुंपण घालून बेकायदेशीर कब्जा मिळवला आहे. ही जागा पिढ्यानपिढ्या इंगळे कुटुंबाच्या ताब्यात असतानाही करण्यात आलेले हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.या अतिक्रमणामुळे समाज पंचायतच्या कार्याला बाधा येत असून, संबंधितांनी ही जागा त्वरित रिकामी करून द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या अर्जाची दखल न घेता जळगाव जामोद तहसील कार्यालयाने कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे विनोद इंगळे यांनी ठाणेदार पोलीस स्टेशन यांना निवेदन सादर केले आहे.
