राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्हा धारणी तालुक्यातील दूनी ग्रामपंचायत अंतर्गत रमाई आवास योजनेत अनियमितता झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती धारणी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात नमूद केल्यानुसार, सन 2024-25 अंतर्गत रमाई आवास योजनेत मंजूर घरकुल लाभार्थी यांनी योजनेच्या नियमांनुसार नवीन घराचे पूर्ण बांधकाम न करता केवळ जुन्या घराची डागडुजी/दुरुस्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण मंजूर रक्कम काढल्याची माहिती तक्रारदारांना मिळाल्याचे निवेदनात म्हटले आहे.सदर प्रकार हा शासनाच्या योजनेच्या नियमांविरुद्ध असून सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ स्थळ पाहणी करून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच दोषी आढळल्यास संबंधित लाभार्थी व जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी आणि शासनाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सह्या असून, प्रतिलिपी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती यांनाही पाठविण्यात आली आहे.
