जळगाव जामोद (प्रतिनिधी):
तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत अंतर्गत जामोद रोडवरील खानी नदीनजीक सुरू असलेल्या स्मशानभूमीच्या बांधकामात शासकीय नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे. कामाचे अंदाजपत्रक आणि माहिती फलक न लावता अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून हे काम रेटले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.शासकीय नियमानुसार कोणत्याही सार्वजनिक कामाच्या ठिकाणी कामाचे स्वरूप, निधी, कंत्राटदाराचे नाव आणि कालावधी यांचा फलक लावणे अनिवार्य आहे. मात्र, महिनाभरापासून सुरू असलेल्या या कामावर असा कोणताही फलक नसल्याने हे काम 'गुप्त' पद्धतीने का केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बांधकामामध्ये वापरले जाणारे साहित्य अत्यंत कमी प्रतीचे असून, यामुळे स्मशानभूमीच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर काम जिल्हा परिषद विभागामार्फत असल्याची चर्चा आहे. मात्र, या विभागाचे अधीक्षक अभियंता किंवा संबंधित शाखा अभियंता यांनी एकदाही कामाची पाहणी केलेली नाही. अभियंत्यांच्या या 'अर्थपूर्ण' दुर्लक्षामुळे कंत्राटदाराचे फावले आहे.स्मशानभूमीच्या कामाची गुणवत्ता तपासावी आणि पारदर्शकता न पाळणाऱ्या कंत्राटदारासह, कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अभियंत्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी," अशी मागणी सूनगाव येथील सजग ग्रामस्थांनी केली आहे.
