जळगाव जामोद (प्रतिनिधी):
रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आदर्श प्रशासक आणि अन्यायाविरुद्ध लढा देणारे महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने त्यांच्या स्मारकाला पुष्प अर्पण करून भावपूर्ण अभिवादन व वंदन करण्यात आले.या पावन प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याला, पराक्रमाला, दूरदृष्टीला आणि रयतेसाठी केलेल्या कार्याला शिवसेनेच्या वतीने नमन करण्यात आले. शिवरायांनी उभारलेले स्वराज्य हे केवळ सत्ता नव्हे, तर न्याय, समता, धर्मनिरपेक्षता, लोककल्याण आणि स्वाभिमानावर उभे असलेले राज्य होते.त्यांचा प्रत्येक निर्णय हा सामान्य माणसाच्या हिताचा विचार करून घेतलेला होता, याची जाणीव या जयंतीनिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली.या कार्यक्रमावेळी शिवसेना शहराध्यक्ष संजय भुजबळ, जिल्हा उपप्रमुख देविदास घोपे, वसंता मिरगे जिल्हा उपसंघटक, प्रसिद्धीप्रमुख बाळू पाटील, किसान सेना तालुकाप्रमुख गजानन देशमुख, राजेंद्र परिहार, प्रकाश भिसे, राणे ताई, देशमुख ताई, रामदास निमकर्डे, अशपाक देशमुख, विलास दातीर, अंबादास धुळे आदी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी एकत्र येत शिवरायांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन केले.शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहित, रयतेचे प्रश्न, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी करताना केवळ उत्सव न करता, शिवरायांच्या विचारांचे आचरण, त्यांच्या स्वराज्य संकल्पनेचा प्रचार आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.शिवरायांचा इतिहास हा केवळ भूतकाळ नसून, आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असा आहे, असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला.
