जळगाव जामोद (प्रतिनिधी):
जळगाव जामोद येथील तहसीलदार पवन पाटील यांच्या कथित असभ्य वर्तवणुकीमुळे आणि अधिकाराच्या गैरवापरामुळे स्थानिक वकील संघात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी जळगाव जामोद बार असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेत तहसीलदारांच्या तात्काळ बदलीची आणि निलंबनाची मागणी केली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना तक्रारीचे निवेदन देण्यात आले असून, जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत तहसीलच्या सर्व कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वकिलांनी घेतला आहे.बार असोसिएशनने दिलेल्या निवेदनात तहसीलदार पवन पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत: यामध्ये तहसीलदार हे विधीज्ञांशी सन्मानाने वागत नाहीत. विधीज्ञ डी.जी. खेडेकर आणि एड. एस.एस. बावणे यांच्याशी तहसीलदारांनी हेतुपुरस्सर वाद घालून अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकाच दिवशी ४० ते ५० महसुली प्रकरणे सुनावणीसाठी ठेवली जातात, मात्र पक्षकारांना त्यांची बाजू मांडण्याची पुरेशी संधी दिली जात नाही.अनेक महसुली प्रकरणे सुनावणी पूर्ण होऊन केवळ 'आदेशासाठी' बंद ठेवली जातात, परंतु त्यावर महिने उलटूनही आदेश पारित केले जात नाहीत.मनाने कारभार: कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन तहसीलदार स्वतःच्या मर्जीने कारभार करत असल्याचा आरोप वकील संघाने केला आहे.तहसीलदारांच्या या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी बार असोसिएशनने विशेष सभा आयोजित केली होती. या सभेत एकमताने निर्णय घेण्यात आला की, तहसीलदार पवन पाटील यांचे निलंबन किंवा बदली होत नाही, तोपर्यंत वकील संघ तहसील न्यायालयातील कोणत्याही कामकाजात सहभागी होणार नाही.निवेदन देताना बार असोसिएशनचे अध्यक्ष एड. शेख इरफान, एड. डी.जी. खर्डेकर, एड. प्रदीप सोळंके, एड. शशिकांत गुप्ता, एड. राहुल इंगळे, एड. करीम खान, एड. एस.एस. बावणे, एड. संदीप मानकर, एड. आनंद जोशी, एड. अभिमन्यू वाघ, एड. विजय वानखडे, एड. रूपेश विश्वेकर, एड. अनंत मानकर, एड. सावळे यांसह मोठ्या संख्येने वकील मंडळी उपस्थित होती.
