जळगाव जामोद (प्रतिनिधी):
तालुक्यातील नगरपरिषद व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या राष्ट्रपुरुष व महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसरात तातडीने सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी आग्रही मागणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात आज, १६ मार्च २०२६ रोजी जळगाव जामोदच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना (SDO) सविस्तर निवेदन देण्यात आले. जळगाव जामोद शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी राष्ट्रपुरुष व महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. हे पुतळे समाजासाठी प्रेरणास्थान असून नागरिक त्यांच्याबद्दल अत्यंत आदराची भावना बाळगतात. मात्र, अनेकदा समाजकंटकांकडून पुतळ्यांच्या परिसरात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन समाजात विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात.अशा अनुचित घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि पुतळ्यांची योग्य सुरक्षा राखण्यासाठी संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे पुतळ्यांच्या परिसरावर चोवीस तास लक्ष राहील आणि कोणताही गैरप्रकार घडल्यास तत्काळ पुरावा उपलब्ध होईल, असा विश्वास भारतीय बौद्ध महासभेने व्यक्त केला आहे.भारतीय बौद्ध महासभेच्या जळगाव जामोद तालुका शाखेने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की, त्यांनी आपल्या स्तरावरून नगरपरिषद मुख्याधिकारी व ग्रामपंचायत संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात लेखी आदेश द्यावेत. महापुरुषांच्या सन्मानाची जोपासना करण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल तातडीने उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.या प्रसंगी तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर, विजय वाकोडे (तालुका सरचिटणीस), आणि विनोद शेगोकार (तालुका कोषाध्यक्ष) डॉ.राजेश वाकोडे, भास्कर जुमळे, उत्तम वानखडे,आनंदा शेगोकार,संघपाल गुरचळ,आनंदा लहासे, भाऊराव निंबाळकर, अनिल तायडे, प्रकाश वाकोडे, संगिता इंगळे, सहदेव खंडेराव,दयाराम सोनोने, सुभाष अंभोरे, गोपाल सोनोने, रामभाऊ तायडे, मधुकर गवई, महादेव पातोडे, तानाजी गवई, सुनंदा पवार यांचेसह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
