जळगाव जामोद (प्रतिनिधी):
राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या कल्याणासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक अनुदानात आता १ हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आली असून, आता लाभार्थ्यांना दरमहा २,५०० रुपये थेट बँक खात्यात मिळणार आहेत. या वाढीव लाभाचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे त्वरित अद्ययावत करावीत, असे आवाहन जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील यांनी केले आहे.शासकीय निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू आहेत. मात्र, अद्याप अनेक लाभार्थ्यांचे युडीआयडी (UDID) कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसल्याचे समोर आले आहे. ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित लाभार्थी वाढीव मानधनापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.वाढीव अनुदानाचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी लाभार्थ्यांनीयुडीआयडी कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र)आधार कार्ड,बँक पासबुक झेरॉक्स ही कागदपत्रे तहसील मधील संजय गांधी योजना कार्यालय तसेच तलाठी कार्यालयात १८ मार्चपर्यंत जमा करणे अनिवार्य आहे.
____________________
"तालुक्यातील एकाही पात्र दिव्यांग बांधवाचा लाभ सुटू नये, हा आमचा उद्देश आहे. लाभार्थ्यांनी ही सर्व कागदपत्रे आपल्या गावातील तलाठी यांच्याकडे किंवा तहसील कार्यालय (संजय गांधी योजना विभाग) येथे १८ मार्च २०२६ पूर्वी अनिवार्यपणे सादर करावीत. तसेच युडीआयडी पोर्टलवरून आपले ई-केवायसी (e-KYC) तातडीने पूर्ण करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार पवन पाटील यांनी केले आहे.या वाढीव मानधनामुळे दिव्यांग बांधवांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून, प्रशासनाने दिलेल्या मुदतीत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण करावी.
