राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
धारणी तालुक्यातील बेरदाभरू–बाबंदा मार्गावर रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास बेरदाभरू फाट्याजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीमध्ये झालेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला.मिळालेल्या माहितीनुसार, मिरा राधेश्याम कास्देकर (वय ४५, रा. चाकरा, ता. खालवा, जि. मध्यप्रदेश) या श्रीराम आसाराम काजले यांच्यासोबत दुचाकी (एमपी 68 झेड डी 5646) वरून बाबंदा येथे नातेवाईकांकडे खाजगी कामानिमित्त आल्या होत्या. काम आटोपून त्या परत जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या निळ्या रंगाच्या सोनालिका ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या धडकेनंतर मिरा कास्देकर या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की प्रत्यक्षदर्शींनुसार त्यांना अत्यंत गंभीर दुखापत झाली होती.घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका बोलावून मृतदेह धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सतीश झाल्टे, पिएसआय अनंत हंकारे तसेच पोलीस कर्मचारी सुमित सुरजुसे, रितेश देशमुख, नामदेव कुरवाडे आणि रामकृष्ण भिलावेकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.अपघात करून फरार झालेल्या ट्रॅक्टरचा पोलिसांनी तत्काळ शोध घेत आरोपी चालक भारत जावरकर (रा. बेरदाभरू) याला अटक केली असून पुढील तपास धारणी पोलीस करीत आहेत.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, बेफिकीर वाहनचालना आणि अतिवेगामुळे वाढत्या अपघातांबाबत नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
