शेगाव/बुलढाणा (प्रतिनिधी):
विश्वमांगल्य सभा विदर्भ प्रांताच्या वतीने “मातृसंस्कार समागम” हा दोन दिवसीय भव्य कार्यक्रम येत्या 28 व 29 मार्च रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑडिटोरियम हाॅलमध्ये होत असल्याची माहिती विदर्भ प्रांत जनसंपर्कसंयोजिका डाॅ.अपर्णाताई कुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.मातृसंस्कार संघटनेची सुरुवात विदर्भातून झाली असून, आज ही संघटना देशातील तब्बल 22 राज्यांमध्ये कार्यरत आहे. सुमारे 8 लाख महिलांचे मजबूत जाळे असलेल्या या संघटनेचे मुख्य ध्येय संस्कृती टिकवून ठेवणे, संस्कार रुजवणे आणि समाजात सदाचार, सामर्थ्य व मूल्यांची जपणूक करणे हे आहे. गेल्या 11 वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेली ही संघटना विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये सक्रिय असून, सुमारे 1500 सदस्य प्रत्यक्ष कार्यात सहभागी आहेत.या समागमाचे हे 9 वे एकत्रीकरण असून 11 व्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थानावरील श्रद्धा व विश्वासामुळे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या प्रसंगी जितेंद्रनाथ महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
समागमात महिलांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रभातफेरी, आकर्षक झाकी यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच देव, देश आणि धर्म या तत्त्वांवर आधारित हा उपक्रम शेगावसारख्या अध्यात्मिक भूमीत होत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.संघटना बळकट व्हावी आणि समाजात चांगले संस्कार रुजावेत या उद्देशाने बालसभा, बालसंस्कार उपक्रम, आरोग्य जनजागृती, जनप्रतिनिधींचा सहभाग अशा विविध अंगांनी कार्य केले जात आहे. विशेष म्हणजे, अनाथ (स्वनाथ) मुलांना मातृत्वाची जाणीव देणे, तसेच “सप्तमातृत्व” या संकल्पनेद्वारे समाजात कुटुंबव्यवस्था आणि ममत्व वृद्धिंगत करण्याचे कार्यही संघटनेतून केले जात आहे.या भव्य समागमासाठी शेगाव नगरी सज्ज झाली असून, विदर्भासह विविध राज्यांतील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे.पत्र परिषदेत विदर्भ प्रांत जनसंपर्क संयोजिका डाॅ अपर्णाताई कुटे,विदर्भ प्रांत अध्यक्ष मधुरा लेंधे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष रश्मी जाजोदिया विदर्भ प्रांत सचिव सचिव निशा टावरी,विदर्भ प्रांत सहसंयोजिका वर्षा उफाळे, अकोला शहर संयोजिका अश्विनी जकाते अकोला शहर कार्यालय प्रमुख सुषमा ठोकळ विश्व मांगल्य सभा शेगाव शहर अध्यक्ष अंजलीताई जोशी शेगाव शहर संयोजिका आरतीताई वैद्य सविता पाटील उपस्थित होत्या.
