जळगाव जामोद (प्रतिनिधी):
एकीकडे ग्रामीण विकासासाठी शासन कोट्यवधींचा निधी खर्च करत असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात मात्र सरकारी निधीची अक्षरशः उधळपट्टी आणि प्रशासकीय अनागोंदीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ व्या वित्त आयोगातून बांधलेला एक पाईप कलव्हर्ट पूल अवघ्या काही महिन्यांतच जमीनदोस्त करून त्याच जागी पुन्हा नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी इंजि. राजू समाधान इंगळे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील लेंडी नदीवर गोरक्षनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर १५ व्या वित्त आयोगातून (२०२२-२३) एक पाईप कलव्हर्ट पूल बांधण्यात आला होता. या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तेव्हाच विरोध दर्शवला होता. आश्चर्य म्हणजे, ज्या कामावर ग्रामसभेने आक्षेप घेतला होता, त्याच कामाचे ४,८०,८११ रुपये नियमबाह्य पद्धतीने कंत्राटदाराला अदा करण्यात आले.धक्कादायक बाब अशी की, मार्च २०२४ मध्ये पूर्ण झालेला हा पूल सप्टेंबर २०२५ मध्ये अचानक तोडून टाकण्यात आला. हा पूल तोडण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा ग्रामपंचायतीचा ठराव नव्हता. असे पत्र ग्रामसेवक जोशी यांनी पंचायत समिती विभागाला दिलेले आहे जुना पूल पाडून त्याच वादग्रस्त जागेवर आता पुन्हा ३४.६२ लाख रुपये खर्चून नवीन पूल आणि संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे.इंजि. राजू इंगळे यांनी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.या तक्रारीमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे.जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागलेले आहे.
