मेळघाटातील ७ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा मुंबईत आढावा...कामांना गती देण्याचे निर्देश...


 मेळघाटातील ७ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा मुंबईत आढावा...कामांना गती देण्याचे निर्देश...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

मेळघाट विधानसभा मतदारसंघातील ७ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी उपस्थित राहून स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडले.बैठकीत मेळघाट परिसरातील बागलिंगा, गौलखेडा बाजार, चुरणी, शहापूर, हिराबंबई, गडगा, रानापीसा तसेच आसपासच्या गावांमध्ये सुरू असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आणि जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत, सद्यस्थिती, कामांची प्रगती, भेडसावणाऱ्या अडचणी आणि पुढील नियोजन यावर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व सुरक्षित पाणी पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने सुरू असलेल्या कामांना गती देण्यावर विशेष भर देण्यात आला.यावेळी आमदार केवलराम काळे यांनी मेळघाटातील आदिवासी व दुर्गम भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याचे निदर्शनास आणून देत, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच पाणीटंचाईग्रस्त भागांसाठी शाश्वत उपाययोजना राबविण्याबाबतही त्यांनी ठाम भूमिका मांडली.बैठकीदरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. नागरिकांना अखंड व स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.या बैठकीस संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post