चिऊताईच्या संवर्धनासाठी जळगाव जामोद सरसावले; 'पर्यावरण मित्र' समूहाचा स्तुत्य उपक्रम..!


 चिऊताईच्या संवर्धनासाठी जळगाव जामोद सरसावले; 'पर्यावरण मित्र' समूहाचा स्तुत्य उपक्रम..!

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

वाढते शहरीकरण आणि कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिमण्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जळगाव जामोद येथील 'पर्यावरण मित्र' समूहाने जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून एक विशेष अभियान राबवले. शहरातील विविध भागांत पक्ष्यांसाठी पाणी पात्रे (Water Bowls) ठेवण्यात आली असून चिमण्यांच्या निवाऱ्यासाठी कृत्रिम घरट्यांचे वाटप व प्रतिष्ठापन करण्यात आले.सध्या तापमानाचा पारा चढत असून मुक्या पाखरांची पाण्यासाठी मोठी वणवण होत आहे. ही गरज ओळखून पर्यावरण मित्रांनी शहराच्या मुख्य ठिकाणी पाण्याचे डेरे लावले आहेत. तसेच, लोकवस्तीत चिमण्यांना सुरक्षित जागा मिळावी यासाठी योग्य ठिकाणी घरटी बसवण्यात आली आहेत. या उपक्रमातून नागरिकांना पक्षी संवर्धनाचे महत्त्व पटवून देत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात आला.​या सामाजिक कार्यासाठी केवळ स्वयंसेवकच नव्हे, तर शासकीय यंत्रणांनीही आपला सहभाग नोंदवला. यात प्रामुख्याने नगरपरिषद कर्मचारी,पोलीस विभाग,वन विभाग,ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.​हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसेनजित मिश्रा, शरद जाधव, सुनील भगत, सचिन जोशी, हरीश शर्मा, अनिल पाटील, शंकर इंगळे आणि अशोक परमार यांनी अथक परिश्रम घेतले. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत स्वतःहून पक्ष्यांच्या पाण्याची जबाबदारी स्वीकारली.

​"निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी वाचवणे काळाची गरज आहे. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम आम्ही सातत्याने राबवणार आहोत."

— पर्यावरण मित्र, जळगाव जामोद

Previous Post Next Post