जळगाव जामोदमध्ये ' नारीशक्ती सन्मान' सोहळा उत्साहात...'व्हिडीओ वॉलंटियर्स' व 'फुले शाहू आंबेडकर विचार मंच' यांचा संयुक्त उपक्रम...


 जळगाव जामोदमध्ये ' नारीशक्ती सन्मान' सोहळा उत्साहात...'व्हिडीओ वॉलंटियर्स' व 'फुले शाहू आंबेडकर विचार मंच' यांचा संयुक्त उपक्रम...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

महिलांच्या कर्तृत्वाला न्याय देण्यासाठी, 'व्हिडीओ वॉलंटियर्स' व 'फुले शाहू आंबेडकर विचार मंच' यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जामोद येथे सलग चौथ्या वर्षी 'सन्मान नारीशक्तीचा' पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समाजाच्या विविध स्तरांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शाहीनाताई पठाण (बुलढाणा) होत्या, तर कार्यक्रमाचे उद्घाटन जिजाताई चांदेकर-राठोड (अध्यक्षा, भा. बहु. लोकशिक्षण संस्था) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून पुष्पाताई भोजने, ॲड. रागिणीताई तायडे, नगरसेविका मीनाताई सातव, सरपंच वर्षाताई वाघ आणि सुनीताताई वानखडे यांची उपस्थिती होती.यावेळी गेल्या ४० वर्षांपासून अहोरात्र प्रसूती सेवा देणाऱ्या आसलगाव येथील शांतबाई तायडे यांचा सत्कार. त्यांना साडी-चोळी, सन्मानचिन्ह (मोमेंटो) आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच, राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या देशातील पहिल्या महिला सर्पमित्र वनिताताई बोराडे यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.​याव्यतिरिक्त, उद्योजक महिला, बचत गटातील प्रतिनिधी, समाजसेविका आणि शिक्षिका अशा तळागाळातील गोरगरिबांसाठी काम करणाऱ्या अनेक रणरागिणींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.​केवळ सन्मानच नव्हे, तर महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी मार्गदर्शक विजय भाऊ पोहनकर यांनी 'उद्योजकता मार्गदर्शन शिबिर' घेतले. आपल्या दैनंदिन वापरातील छोट्या-छोट्या वस्तूंपासून घरबसल्या उद्योग कसा सुरू करावा आणि तो कसा वाढवावा, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.​कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन 'व्हिडीओ वॉलंटियर्स'चे कंटेंट क्रिएटर विनोद वानखडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अस्मिता दिलीप कोकाटे यांनी केले.कार्यक्रमाला तालुक्यातील महिलांची मोठी उपस्थिती होती.

Previous Post Next Post