मेळघाटात पाणीपुरवठा योजनांचा कोट्यवधींचा घोटाळा?; कामे न करताच बिले काढल्याचा आरोप...जल जीवन मिशनसह अनेक योजना कागदावरच; युवक काँग्रेसचा इशारा – चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
मेळघाटातील दुर्गम आणि आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही गंभीर असताना पाणीपुरवठा विभागातील कथित भ्रष्टाचारामुळे कोट्यवधी रुपयांच्या योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणीटंचाईच्या नावाखाली मोटरपंप बसविणे, बोरवेल खोदकाम, विहिरींची दुरुस्ती, पाइपलाइन टाकणे तसेच दुरुस्तीची विविध कामे प्रत्यक्षात न करता अधिकारी व त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांनी कोट्यवधी रुपयांची बिले काढल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसने केला आहे.मेळघाटातील अनेक गावांसाठी शासनाने पाणीपुरवठा योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला होता. मात्र, प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये परिस्थिती बदललेली दिसत नाही. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बंद अवस्थेत असून, पाइपलाइन टाकण्यात आली असली तरी पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे शासनाच्या योजना केवळ कागदावरच राबविल्या जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेअंतर्गतही मेळघाटातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही. काही गावांमध्ये पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असल्या तरी त्या वापरात नसल्याने कोट्यवधींचा निधी वाया गेल्याची चर्चा सुरू आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये आजही महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी लांब अंतरावर जावे लागत असल्याने प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागातील अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला. मेळघाटातील सर्व पाणीपुरवठा योजनांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने कार्यक्षम पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.युवक काँग्रेसकडे या प्रकरणासंदर्भातील काही ठोस पुरावे असून, लवकरच संपूर्ण प्रकार पुराव्यांसह जनतेसमोर मांडण्यात येईल, असा इशाराही राहुल येवले यांनी दिला. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिल्याने या प्रकरणाने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.मेळघाटासारख्या दुर्गम आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असताना, योजनांमधील कथित अनियमितता उघड होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
_____________________________
“मेळघाटातील पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती आमच्याकडे आहे. संपूर्ण प्रकरणाचे पुरावे लवकरच जनतेसमोर मांडले जातील. प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
— राहुल येवले, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस


