जळगाव जामोद (प्रतिनिधी):
"आदिवासी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते आदि सत्य सनातन हिंदू धर्माचेच मूळ वासी आहेत," असे प्रतिपादन मध्य प्रदेशातील शबरीधाम अंबा आश्रम येथील संत रामचरण महाराज यांनी केले. वसाली येथे आयोजित 'फगवा संमेलनात' ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.होळीनंतरचा लोकोत्सव म्हणून ओळखले जाणारे हे फगवा संमेलन १४ मार्च रोजी वनवासी सेवा समिती जामोद आणि फगवा उत्सव समिती वसाली यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात वीर हनुमान यांच्या आरतीने झाली.
--धर्मांतराच्या संकटाबाबत इशारा--
उपस्थितांना संबोधित करताना संत रामचरण महाराज म्हणाले की, "आम्ही वनात राहतो म्हणून आम्हाला वनवासी संबोधले जाते, पण आमचा सनातन हिंदू धर्म आम्हाला प्राणांहून प्रिय आहे. 'कंधो से उची छाती नही होती, धर्म से बडी कोई जाती नही होती; दीपक ही नही बचा तो बाती का क्या करोगे, सनातन हिंदू धर्म ही नही बचा तो जाती का क्या करोगे' अशा शब्दांत त्यांनी धर्माचे महत्त्व अधोरेखित केले."
त्यांनी ख्रिश्चन मिशनरी आणि अन्य धर्मीयांच्या छुप्या कारवायांकडे लक्ष वेधत, आदिवासी बांधवांनी धर्मांतरापासून सावध राहण्याचे आवाहन केले. "भारत मातेला माता न मानणारे आमचे असू शकत नाहीत. स्वतःच्या धर्मात मरण आले तरी चालेल, पण परधर्म स्वीकारू नका," असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच २२ मे रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या 'डिलीस्टिंग मोर्चा'मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश नथ्थाणी होते. प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री विष्णूजी देशमुख, बुलढाणा विभाग संघचालक चित्तरंजनजी राठी, खामगाव जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, वनवासी कल्याण आश्रमाचे गजाननराव सोलकर, राजेशजी झापर्डे, गोविंदजी बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. विष्णूजी देशमुख यांनीही यावेळी आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र बोदडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र गांधी यांनी मानले. या सोहळ्याला सरपंच सिकंदर बाबर, मिलिंद जोशी, सचिनबापू देशमुख, प्रकाश बोदडे, प्रदीप भुतडा यांच्यासह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वनवासी कल्याण आश्रम आणि भारतीय मजदूर संघाचे शेकडो कार्यकर्ते व हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते.
