सुनगाव नगरीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास; प्रबोधनात्मक व्याख्यान व मूक पदयात्रेने दिली मानवंदना...


 सुनगाव नगरीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास; प्रबोधनात्मक व्याख्यान व मूक पदयात्रेने दिली मानवंदना...

​जळगाव जामोद (प्रतिनिधी):

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनीय बलिदानाचा वारसा जपत, जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव नगरीमध्ये 'बलिदान मास' अत्यंत श्रद्धापूर्वक व शिस्तबद्ध पद्धतीने पाळण्यात आला. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या ३० दिवसांच्या कालावधीत संपूर्ण गावाने महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केले.​या महिनाभर चाललेल्या बलिदान मासात सुनगावमधील अबालवृद्धांनी अनोखी श्रद्धा व्यक्त केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे दुःख व्यक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी हा महिना 'सूतक' असल्याप्रमाणे पाळला.यात ​अनेकांनी या काळात मुंडण केले.

​अनेकांनी महिनाभर गोड पदार्थांचा त्याग केला.

​अनेकांनी आपल्या आवडीच्या वस्तू व पदार्थांचा त्याग करून महाराजांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.दररोज गावातील वेगवेगळ्या भागात जाऊन बलिदान मासाचे महत्त्व आणि संभाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती देण्यात येत होती.​दिनांक १७/०३/२०२६ (मंगळवार) रोजी जय बजरंग चौक (जय महाराष्ट्र मित्र मंडळ) येथे ह.भ.प. गजानन महाराज दहिकर यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी सुनगाव व परिसरातील सुमारे १५०० हून अधिक महिला व पुरुष उपस्थित होते.

_____________________

​यावेळी मार्गदर्शन करताना ह.भ.प. गजानन महाराज दहिकर यांनी समाजाला परखड अंजन घातले. ते म्हणाले की:

​"जर तुम्हाला देश आणि धर्मासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांसारखे व्हायचे असेल, तर सर्वात आधी व्यसनाचा मार्ग सोडा. घरातील कर्त्या पुरुषाने जर बाटली सोडली, तर त्या कुटुंबाचे भले झाल्याशिवाय राहणार नाही. व्यसनमुक्ती हाच महाराजांना खरा मानाचा मुजरा ठरेल."

_____________________

​बलिदान मासाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १८/०३/२०२६ (फाल्गुन अमावस्या) रोजी सायंकाळी ७ वाजता श्री महादेव मढी संस्थान येथून भव्य 'मूक पदयात्रा' काढण्यात आली. इतिहासकाळात महाराजांची जी अंत्ययात्रा निघाली नव्हती, ती उणीव भरून काढण्यासाठी अत्यंत शोकाकुल वातावरणात ही मूक पदयात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आली.​या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व समस्त सुनगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमामुळे परिसरात शिवशंभूंच्या विचारांचे आणि बलिदानाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Previous Post Next Post