खळबळजनक:बेलखेडमध्ये जन्मदात्या पित्याची हत्या; आरोपी मुलाला अवघ्या दोन तासांत बेड्या...
प्रशांत भोपळे/हिवरखेड (प्रतिनिधी):
कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज बेलखेड येथे घडली. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून हिवरखेड पोलिसांनी अत्यंत चपळाईने तपास चक्रे फिरवत आरोपी मुलाला अवघ्या दोन तासांच्या आत अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजेच्या सुमारास हिवरखेड पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी दीपक रामदास चतुरकार राहणार बेलखेड याने त्याचे वडील रामदास सहदेवराव चतुरकार यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्यांना जीवानिशी ठार केले आहे. ही घटना घडल्यानंतर आरोपी दीपक घटनास्थळावरून पसार झाला होता.घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड यांनी तातडीने कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीने पथक तयार करण्यात आले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ गिलबिले, पोहेकॉ प्रफुल पवार आणि पोहेकॉ प्रमोद चव्हाण यांचा समावेश होता.ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवली. आरोपी दीपक हा 'दहिगाव फाटा' ते 'पंचगव्हाण फाटा' या दरम्यान पळून जात असताना, पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन तासांत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन राठोड व त्यांच्या टीमने यशस्वीरीत्या पार पाडली. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
