शेगावात भाजपाच्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत विदर्भ विभाग कार्यशाळा संपन्न...


 शेगावात भाजपाच्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत विदर्भ विभाग कार्यशाळा संपन्न...

बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी):

शेगाव येथील होटल विघ्नहर्ता ईन येथे भारतीय जनता पार्टीच्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत विदर्भ विभागीय कार्यशाळा उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. पक्ष संघटन बळकट करण्यासोबतच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शासनाच्या योजनांची सखोल माहिती देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.कार्यशाळेच्या प्रारंभी नोंदणी व उद्घाटन सत्रानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ‘वंदे मातरम्’ व महाराष्ट्र गीताने वातावरण राष्ट्रभावनेने भारावून गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले. त्यांनी प्रशिक्षण महाअभियानाची संकल्पना, पक्ष विस्तारातील त्याचे महत्त्व आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली जबाबदारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.यानंतर जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे सादरीकरण (PPT) संयोजक राजेश पांडे यांनी केले. विविध सत्रांमध्ये संघटन कौशल्य, मतदार संपर्क, तसेच ‘SIR’ विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कामगार कल्याण मंत्री अॅड. आकाश फुंडकर, खा अनूप धोत्रे,प्रविण पोटे,रामदास तडस,संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, दिनेश सूर्यवंशी,आ.रणधीर सावरकर,अर्चनाताई डेहनकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या समारोपावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला.

“पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला ‘अंत्योदय’चा विचार हा भाजपाचा आत्मा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून शासनाच्या योजनांचा लाभ देणे, हे आपले कर्तव्य आहे. संघटन मजबूत असेल तरच विकासाची गती वाढते. प्रशिक्षणातून मिळालेली शिकवण प्रत्यक्ष कामात उतरवून जनतेचा विश्वास अधिक दृढ करा.”ते पुढे म्हणाले की, “आजचा कार्यकर्ता हा केवळ राजकीय कार्यकर्ता नसून समाजसेवक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अचूक माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या सोडविणे हीच खरी सेवा आहे. आगामी काळात बूथ स्तरापर्यंत संघटन अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल.”कार्यशाळेचे सूत्रसंचालन धर्मपाल मेश्राम यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यशाळेमुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक कौशल्य, प्रभावी संवाद आणि शासनाच्या योजनांची अंमलबजावणी याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाल्याने आगामी काळात पक्षकार्य अधिक सक्षमपणे राबविण्यास बळ मिळणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.शेवटी दिनेश सुर्यवंशी यांनी आभार मानले.

Previous Post Next Post