बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी):
विदर्भ क्रिकेट असोसिएशन तर्फे प्रतिभावान गोलंदाज शोधण्यासाठी ‘गोलंदाज शोध’ या विशेष उपक्रमांतर्गत विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये खुल्या निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी विदर्भ प्रीमियर लीग पर्व 2 च्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत असून युवा गोलंदाजांना आपले कौशल्य दाखविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.या निवड चाचण्यांवर भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रशांत वैद्य, माजी राष्ट्रीय निवडकर्ता सुब्रोतो बॅनर्जी तसेच माजी बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासह व्हीसीएच्या विविध निवड समित्यांचे सदस्य देखरेख ठेवणार आहेत.बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ही निवड चाचणी तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे १७ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे. पुरुष गोलंदाजांसाठी वयोमर्यादा १६ ते २५ वर्षे तर महिला गोलंदाजांसाठी १५ ते २३ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.सर्व इच्छुक खेळाडूंनी समन्वयक चंद्रकांत साळुंखे यांच्याशी संपर्क साधून गुगल फॉर्म भरावा. फॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख १३ मे २०२६ आहे.निवड झालेल्या खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळणार असून त्यांना तज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षण, फिटनेस मार्गदर्शन व तांत्रिक सल्ला दिला जाणार आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाजांना विदर्भ प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा १ ते १५ जून २०२६ दरम्यान होणार आहे.खेळाडूंनी क्रिकेटचा पोशाख (शक्यतो पांढरा) तसेच वयाचा वैध पुरावा सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रिकेट समितीचे अध्यक्ष नितेश उपाध्याय सर, विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे बुलढाणा जिल्ह्याचे संयोजक किशोर वाकोडे आणि मोहम्मद साबिर यांनी केले आहे.
