संचमान्यतेच्या घातक निकषांविरोधात ११ मे रोजी पुण्यात मोर्चा..हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती; विज्युक्टाचा आरोप...

संचमान्यतेच्या घातक निकषांविरोधात ११ मे रोजी पुण्यात मोर्चा..हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती; विज्युक्टाचा आरोप...

जळगाव जामोद(प्रतिनिधी)- 

राज्य शासनाच्या ऑनलाइन संचमान्यता प्रक्रियेमध्ये घालण्यात आलेल्या नव्या निकषांमुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता असून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप विज्युक्टा व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घातक निकषांविरोधात दि. ११ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ऑनलाइन संचमान्यतेच्या माध्यमातून शिक्षकांची रिक्त पदे न दाखविण्याचा प्रयत्न सुरू असून शिक्षक पात्रता उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या भरतीची दारे बंद करण्याचा घाट घातला जात आहे. यापूर्वी १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेतील घातक निकषांमुळे राज्यातील सुमारे आठ हजार शाळा बंद होण्याचा निर्णय झाला असून हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत.आता उच्च माध्यमिक स्तरावरील संचमान्यता ऑनलाइन करण्याच्या निमित्ताने हजारो कनिष्ठ महाविद्यालये अनुदानासाठी अपात्र ठरतील, असा आरोपही करण्यात आला आहे. राज्यात तब्बल दहा ते बारा हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता असल्याचे संघटनेने म्हटले आहे.एका वर्गात १२० विद्यार्थी शिकविण्याची अट विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचे सांगताना विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिक गटासाठी २० विद्यार्थ्यांच्या मर्यादेऐवजी ४० विद्यार्थ्यांचा निकष लावण्यात आल्याची टीका करण्यात आली. तसेच २० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या विद्यार्थ्यांना ग्राह्य न धरणे, मुलींसाठी असलेली सवलत, आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थी संख्येवरील सूट यांसारखे प्रचलित निकष डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांनी हा निर्णय मोफत शिक्षण व्यवस्थेला संपविणारा असून विद्यार्थी, शिक्षक व समाजहिताच्या विरोधातील असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात सर्व शिक्षकांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.महासंघ व विज्युक्टाच्या कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयानुसार दि. ११ मे रोजी पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून त्यामध्ये अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रांत उपाध्यक्ष प्रा. शिवराम बावस्कर, जिल्हाध्यक्ष प्रा. किशोर काकडे, जिल्हा सचिव प्रा.रवींद्र काळे, सदस्य प्रा. गजानन गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. गणेश भरगडे, प्रा. जगन्नाथ निकस, कार्याध्यक्ष प्रा. नंदकिशोर वानखडे, संघटन सचिव प्रा. इरफान सर, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष प्रा.ऋषिकेश कांडलकर आदींनी केले आहे.

 

Previous Post Next Post