जळगाव जामोद (प्रतिनिधी):
सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत भाजपा युवा मोर्चाचे जळगाव जामोद तालुकाध्यक्ष परिक्षीत ठाकरे यांनी पळशी सुपो ग्रामसेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा धुव्वा उडवत ३४ मतांच्या मोठ्या आघाडीसह विजयाला गवसणी घातली.अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत परिक्षीत ठाकरे यांना एकूण ११५ मते मिळाली. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा ३४ मते अधिक मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांच्या या विजयामुळे पळशी सुपो परिसरात भारतीय जनता पक्ष आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा विजय म्हणजे जनतेचा त्यांच्यावर असलेल्या विश्वासाची पोचपावती असल्याचे बोलले जात आहे.निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.फटाक्यांची आतषबाजी करत परिक्षीत ठाकरेंच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. हा विजय येणाऱ्या काळातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील बदलाची नांदी मानला जात आहे.परिक्षीत ठाकरे यांच्या या दिमाखदार विजयाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून ते आता शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
____________________
"हा विजय केवळ माझा नसून मला साथ देणाऱ्या प्रत्येक सभासदाचा आणि कार्यकर्त्याचा आहे. मिळालेल्या संधीचे सोने करून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहीन."
— परिक्षीत ठाकरे (तालुकाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा)
____________________
विजयाबद्दल परिक्षीत ठाकरे यांचे सर्व सहकारी व मित्रांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
