NEET पेपरफुटी प्रकरणी कडक कारवाई करा आणि शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल द्या; काँग्रेस कमिटीचे राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन...
जळगाव जामोद(प्रतिनिधी):
देशातील शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण थांबवून NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा, तसेच चालू शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे, या मागण्यांसाठी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने देशाच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशामध्ये शिक्षण क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण होत असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात आहे. नुकत्याच झालेल्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील सुमारे २२ लाख ८० हजार विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. या प्रकरणातील संबंधित आरोपी कुलकर्णी, वाघमारे व इतर संबंधित अधिकारी आणि दोषींना तातडीने सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या गंभीर प्रकरणाची जलदगती न्यायालयामार्फत सुनावणी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, असेही निवेदनात नमूद केले आहे.सध्या शेती मशागतीचे दिवस सुरू असून शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. मात्र, अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल दिले जात नाही. परिणामी, शेतकऱ्यांना आपले ट्रॅक्टर घेऊन १५ ते २० किलोमीटर अंतरावरील पंपांवर जावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून इंधनाचाही मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे.

त्यामुळे प्रशासनाने तातडीने आदेश काढून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वापरासाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासोबतच वाढती महागाई लक्षात घेता पेट्रोल व डिझेलचे वाढलेले दर तातडीने कमी करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.हे निवेदन १८ मे २०२६ रोजी जळगाव जामोद चे तहसीलदार यांच्यामार्फत प्रशासनाला सादर करण्यात आले.निवेदन देतेवेळी पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर,रामविजय बुरुंगले, प्रकाश पाटील,राजीव घुटे, समाधान दामधर, तालुकाध्यक्ष एडवोकेट भाऊराव भालेराव,अच्छे खा पठाण, कैलास बोडखे, डॉक्टर प्रशांत राजपूत,अविनाश उमरकर, शहर अध्यक्ष अमर पाचपोर, राजू पाटील, तुकाराम गटमने, अजय राजपूत,परवीन ताई देशमुख, नगरसेविका वैशाली तायडे, मीना ताई सातव, भारसाकळे सर, नगरसेविका सुनिता भारसाकडे,दिनेश काटकर, सुरेश वानखडे ऍड रतन इंगळे, शंकर म्हस्के, श्रीकृष्ण केदार,ऍड संदिप मानकर, ऍड काकडे, ओ.पी तायडे , आसिफ इकबाल,सै.हुसेन राही जुनेद शेख, शहर कार्याध्यक्ष नासिर भाई, अझर देशमुख,वकील खान, बाबूभाई जमादार, अयाज भाई,निलेश तायडे, धनंजय बोंबटकार ,अनिल इंगळे,अफरोज भाई, प्रभुदास बंबटकर,सै.तौफिक, मारोती सुरडकर, नितीन जाधव, मन्सूर भाई यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.