संत्रा मृग बहार पीकविमा योजना ताबडतोब सुरू करा...संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली,शेतकऱ्यांची मागणी...


 संत्रा मृग बहार पीकविमा योजना ताबडतोब सुरू करा...संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली,शेतकऱ्यांची मागणी...

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...

अकोट तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मृग बहार हंगामातील फळपीक विमा योजना अद्याप लागू झालेली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहार हंगामासाठी संत्रा पिकाचा समावेश केला असला,तरी अनेक भागांमध्ये योजनेची अंमलबजावणी आणि विमा नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.संत्रा हे हवामानावर अवलंबून असलेले संवेदनशील पीक आहे.कमी अधिक पाऊस,तापमानातील तीव्र चढ-उतार,गारपीट तसेच इतर नैसर्गिक आपत्तींचा थेट परिणाम उत्पादनावर होतो.अशा परिस्थितीत पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरू शकतो.मात्र योजना सुरू होण्यास होत असलेल्या विलंबामुळे उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे.मागील हंगामात राज्य शासनाने मृग बहार फळपीक विमा योजनेत संत्रा पिकाचा समावेश केल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले होते.मात्र यंदाच्या २०२६ च्या मृग बहार हंगामासाठी अद्याप नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नसल्याने तसेच विमा सहभागाची अंतिम मुदतही जाहीर करण्यात आलेली नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.संत्रा उत्पादकांना तातडीने पीक विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे,विमा नोंदणी प्रक्रिया त्वरित सुरू करावी.आणि मृग बहार पीक विमा योजनेबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात,अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.तसेच विमा योजनेतील अटी व शर्ती या विमा कंपन्यांपेक्षा शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या असाव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

_____________________________

संत्रा मृग बहार विमा योजने बाबत यंदाच्या वर्षीचा शासन निर्णय अद्याप प्राप्त झालेला नाही.शासन निर्णय प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.

      मुरली इंगळे

जिल्हा कृषी अधीक्षक अकोला

_____________________________

कृषी विभागाने मृग बहार संत्रा विमाकडे तातडीने लक्ष देऊन संत्रा उत्पादकांना दिलासा द्यावा.पीक विम्याच्या अटी व शर्ती शेतकऱ्यांच्या हिताच्या असाव्यात केवळ विमा कंपन्यांच्या फायद्याच्या नसाव्यात.शासनाने त्यानुसार आवश्यक बदल करावेत.

शिरीष महाले शेतकरी शिवपूर

_____________________________

शासनाने संत्रा मृग बहारचा विमा ताबडतोब सुरू करावा.जेणे करून शेतकऱ्यांना विमा भरणे सोईचे होईल.

रविंद्र घोरड शेतकरी रामापूर .

Previous Post Next Post