लोकशाही बळकट करण्यासाठी एसआयआर मोहिमेला सहकार्य करा : माजी नगरसेवक निलेश शर्मा...


 लोकशाही बळकट करण्यासाठी एसआयआर मोहिमेला सहकार्य करा : माजी नगरसेवक निलेश शर्मा...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

लोकशाही व्यवस्थेचा पाया असलेल्या मतदान प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. मतदार यादीत आपले नाव, पत्ता व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ भाजपाचे बीएलए प्रमुख निलेश शर्मा यांनी केले आहे.त्यांनी निवेदनात म्हंटले आहे की, मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. तो प्रभावीपणे बजावण्यासाठी मतदार यादीतील नोंद अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदारांची नोंदणी, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, तसेच, मतदारांच्या तपशीलामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याचे काम सुरू आहे.युवा पिढीने या प्रक्रियेत विशेष सहभाग नोंदविण्याची गरज असल्याचे सांगताना त्यांनी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व पात्र युवक-युवतींनी तातडीने मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. ज्या मतदारांनी निवासस्थान बदलले आहे किंवा नाव, पत्ता, जन्मतारीख यासारख्या तपशीलांमध्ये दुरुस्ती आवश्यक आहे, त्यांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असेही यांनी म्हटले आहे.निवडणुकीच्या वेळी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रत्येकाने आत्ताच मतदार यादी तपासून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे त्यांनी नमूद केले.जळगाव जा. विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपल्या भागातील बीएलओ अथवा संबंधित निवडणूक नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधून मतदार यादीतील नावाची पडताळणी करून घ्यावी. मतदार यादीत नाव असेल तरच, मतदानाचा हक्क बजावता येईल असे त्यांनी नमूद केले आहे.

Previous Post Next Post