जळगाव जामोद (प्रतिनिधी):
मातोश्री नथियाबाई विद्यालय, सुनगाव येथील माजी विद्यार्थी निखिल पांडुरंग धुळे यांनी आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर 'फॉरेस्ट सर्व्हेअर' (सीनियर सर्व्हेअर ऑफिसर, अमरावती विभाग) या पदावर नियुक्ती मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल मातोश्री नथियाबाई विद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.केवळ यशाच्या शिखरावर पोहोचून थांबले नाहीत, तर आपल्या शाळेप्रती असलेल्या प्रेमापोटी निखिल धुळे यांनी विद्यालयातील विद्यार्थी, पालक आणि अभ्यागतांची गैरसोय टाळण्यासाठी दोन सिमेंटचे बेंच देणगी म्हणून दिले आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि शाळेप्रती असलेल्या आदराचे सर्वत्र कौतुक होत आहे.या सत्काराप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सोळंके, शिक्षक अढाव, फोलाने, पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी विशाल वसुलकार प्रामुख्याने उपस्थित होते. निखिल धुळे यांच्या यशाने विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांना पुढील वाटचालीस उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.निखिल धुळे यांचा हा प्रवास भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
