जळगाव जामोद (प्रतिनिधी):
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथे काळवीट या वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांची अवैध शिकार करणाऱ्यांवर वनविभागाकडून कारवाईची मागणी होत असतानाच, आता स्थानिक नागरिकांनी परिसरातील इतर सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरही वनविभागाने कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी केली आहे.दिनांक ०६/०७/२०२६ रोजी वनविभागाला गाडेगाव खुर्द येथे वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, वनपाल पाथ्रीकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकली असता, शंकर दामा मुंडे, शिवहरी दामा मुंडे आणि देविदास दामा मुंडे यांच्या घरी काळवीटाचे मांस शिजवत असल्याचे आढळून आले. वनविभागाने तत्काळ कारवाई करत या तिघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. यातील दोघांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. या कारवाईत काळवीटाचे मांस आणि जिवंत 'तितर' पक्षी जप्त करण्यात आले आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपींना दिनांक ०७/०७/२०२६ रोजी प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींना चार दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.वनविभागाच्या या कारवाईचे स्वागत होत असले तरी, स्थानिक सुज्ञ नागरिकांनी वनपरिक्षेत्रातील इतर अनेक अवैध धंद्यांकडे लक्ष वेधले आहे. शिकारी सोबतच वनजमिनीवर होणारी अतिक्रमणे, अवैध वृक्षतोड आणि इतर बेकायदेशीर प्रकारांवर वनविभागाने आता कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे."कोणतीही वन्यजीव शिकारीची घटना निदर्शनास आल्यास त्वरित वनविभागाला कळवावे. वन्यप्राण्यांची शिकार करणे हा गंभीर गुन्हा असून, यासाठी ७ वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे," असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आता वनविभाग या मागणीची कितपत दखल घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
