सरोजदेवी किसनलालजी केला, सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद येथे कृषी सप्ताहाचे मोठ्या उत्साहात आयोजन....


 सरोजदेवी किसनलालजी केला, सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद येथे कृषी सप्ताहाचे मोठ्या उत्साहात आयोजन....

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

 दि. १ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेमध्ये कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता दि.११ जुलै रोजी भव्य कृषी प्रदर्शनीने करण्यात आली.या कृषी सप्ताहात विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी जागरूकता निर्माण व्हावी, कृषी संस्कृतीची ओळख व्हावी तसेच निसर्ग, पर्यावरण आणि अन्नधान्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांसाठी बियाणे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. छोट्या-छोट्या बियांचा वापर करून विद्यार्थ्यांनी आकर्षक व कल्पक चित्रे साकारली. यातून विद्यार्थ्यांची कल्पकता बियांची, ओळख आकार, रंग समजण्यास मदत झाली.इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी कृषी विषयाशी निगडित विविध शैक्षणिक व मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनी खेळातून शेतीविषयक संकल्पना आनंदाने आत्मसात केल्या.इयत्ता पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची माती, झाडांची पाने, मुळे तसेच नैसर्गिक घटकांचे संकलन करून त्याविषयी माहितीपूर्ण व आकर्षक चार्ट तयार केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी जैवविविधता, मातीचे प्रकार, मुळांचे प्रकार, पानांचे प्रकार व त्याचे आकार हा त्यांच्या अभ्यासक्रमातील असलेला विज्ञान विषयातील घटक अभ्यासला त्याचबरोबर वनस्पतींचे महत्त्व जाणून घेतले.इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांनी शेती, शेतकरी, पर्यावरण आणि अन्नसुरक्षा या विषयांवर प्रभावी घोषवाक्ये तयार केली. तसेच विविध प्रकारची धान्ये व बियाण्यांचे संकलन इयत्ता नववी मध्ये असलेल्या विज्ञान विषयातील बियाण्यांचा घटक अभ्यासला तसेच त्यांची माहिती, पोषणमूल्ये, पिकाचा प्रकार, पेरणी व काढणीचा हंगाम आदी माहितींसह आकर्षक प्रदर्शनी सादर केली.

दि. ११ जुलै शनिवार रोजी शाळेचे अध्यक्ष, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. श्री किशोर केला सर व शाळेच्या मुख्य संयोजिका डॉ. स्वातीताई किशोरजी केला मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आयोजित या कृषी प्रदर्शनीमध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे सर, तसेच प्राचार्य विनोद ईश्वरे, प्राचार्य राजेशजी लोहिया सर, पर्यवेक्षिका व्यवहारे मॅडम, म्हसाळ मॅडम, यांचा उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाची प्रस्तावना शारदा अत्तरकार मॅडम यांनी केली. तर कृषी दिनानिमित्त वर्ग नववीची विद्यार्थिनी कु. आरुषी योगेश जोशी हिने माहिती सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साकेत गिरजापुरे सर यांनी केले. या विशेष सप्ताहासाठी विद्यार्थ्यांनी विविध विषयावर केलेले चार्ट, घोषवाक्ये, बियाण्यांचे संग्रह, विविध धान्यांचे नमुने, मातीचे प्रकार तसेच कृषीविषयक माहिती अशा सर्व साहित्यांचे वसंतराव नाईक कृषी दालनात पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, अभ्यासपूर्ण सादरीकरणाचे आणि कृषीविषयीच्या जिज्ञासेचे सर्वांनी कौतुक केले.या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आदर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि भारतीय कृषी संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होण्यास निश्चितच मदत झाली.या संपूर्ण कृषी सप्ताहाचे नियोजन व यशस्वी योगेश घुटे, साकेत गिरजापुरे, नितीन बेंदरकार तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे कृषी सप्ताह  यशस्वीरित्या पार पडला.या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

Previous Post Next Post