सैय्यद शेकील/ अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट अकोट तालुक्यातील पोपटखेड येथील गाजीपुर, रुधाडी गिट्टी खदानीतून गिट्टी आणि डस्टची वाहतूक करणारे टिप्पर चालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहेत. शासनाने बंधनकारक केलेल्या ग्रीन नेटचा वापर या टिप्परमध्ये अजिबात केला जात नसल्याने परिसरातील नागरिकांच्या डोळ्यात धुरळा उडतो यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.नियमानुसार गिट्टी, वाळू, डस्ट यांसारख्या बांधकाम साहित्याची वाहतूक करताना टिप्परवर ग्रीन नेट किंवा ताडपत्री लावणे बंधनकारक आहे. यामुळे रस्त्यावर धूळ उडू नये आणि इतर वाहनधारकांना त्रास होऊ नये.मात्र पोपटखेड येथील गाजीपुर, रुथाडी खदानीतून दिवसभर येणाऱ्या-जाणाऱ्या बहुतांश टिप्पर चालकांकडून या नियमाचे पालन होत नाही. उघड्या टिप्परमधून गिट्टी आणि डस्टची वाहतूक होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुरळा उडतो. त्यामुळे रस्त्यालगतच्या घरांतील नागरिक, शेतकरी आणि शाळकरी मुलांना श्वसनाचे त्रास जाणवत आहेत.
------------------------
अपघाताचा धोका वाढला...
उघड्या टिप्परमधून गिट्टीचे दगड आणि डस्ट खाली पडून रस्ता खराब होतो. त्यामुळे दुचाकी घसरून पडण्याच्या अपघाताचा धोखा निर्माण होतो.तसेच मागून येणाऱ्या वाहनांच्या चालकांच्या डोळ्यात धूळ जाणे असे प्रकारही घडत आहेत.पोपटखेड ते अकोट या मार्गावर दिवसभर मोठी वाहतूक असते. अशा परिस्थितीत नियम न पाळणाऱ्या टिप्परमुळे अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
------------------------
प्रशासनाकडे कारवाईची मागणी
या बेजबाबदार वाहतुकीमुळे आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी आरटीओ, पोलीस आणि महसूल प्रशासनाने पोपटखेड गाजीपुर, रुधाडी, खदानीतील वाहतुकीवर लक्ष ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या टिप्पर चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. खदानी मालकांनीही आपल्या टिप्पर चालकांना ग्रीन नेट वापरण्याचे बंधन घालावे आणि नियमांचे पालन व्हावे यासाठी दक्षता घ्यावी, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
