बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी:
बुलढाणा जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, कायदा व सुव्यवस्थेचा बिघडलेला प्रश्न तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या कथित निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ शिवसेना, धर्मवीर युथ फाऊंडेशन व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली.धर्मवीर युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात शेकडो युवक, शिवसैनिक, नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनस्थळी घोषणाबाजी करत जिल्हा पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
उपोषणकर्त्यांनी सांगितले की, बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू, जुगार, वरली मटका, वाळू तस्करी, गोवंश तस्करी, अमली पदार्थांची विक्री अशा विविध अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून त्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.आंदोलनादरम्यान एका घटनेचाही उल्लेख करण्यात आला. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मागील काळात आपल्या आजारी आईसाठी औषध आणण्यासाठी मेडिकलमध्ये गेलेल्या एका शेतकरी पुत्राला कोणतीही विचारपूस न करता जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी त्या मुलाची गाडी अडवून काही विचारात न घेता मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. अशा घटनांमुळे पोलीस प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात सातत्याने घरफोड्या, दुचाकी व चारचाकी वाहन चोरी, मोबाईल चोरी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून अनेक प्रकरणांमध्ये अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही. काही प्रकरणांमध्ये आरोपींबाबत माहिती असूनही त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.तसेच जळगाव जामोद तालुक्यातील रसलपूर परिसरात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसून मृतदेहाची ओळखही पटलेली नाही. या प्रकरणात निष्पाप नागरिकांना मारहाण करून गुन्ह्याची कबुली देण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.
बुलढाणा जिल्ह्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून अनेक प्रकरणांचा अद्याप छडा लागलेला नाही. तसेच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी सुरू असून त्यावरही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला.या सर्व घटनांची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या कार्यकाळाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांनी केलीयावेळी धर्मवीर युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी सांगितले की, "जोपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील."यावेळी बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अल्पसंख्याक सेना, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...!
