प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
बुलढाणा व अकोला या दोन जिल्ह्यांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ३७ वर्षे शिक्षिका म्हणून उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या आदर्श शिक्षिका साधनाताई श्यामशील भोपळे यांच्या सेवापूर्तीनिमित्त माहेश्वरी भवन, हिवरखेड येथे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रशासन अधिकारी सुभाष राऊत होते. प्रमुख उपस्थिती म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकरराव पुंडकर, माजी गटविकास अधिकारी अशोक बांगर, माजी विस्तार अधिकारी रामेश्वरजी बोचरे, चित्रलेखाताई बोचरे, केंद्रप्रमुख गजानन राऊत, केंद्रप्रमुख गोपाल मोहे यांच्यासह सत्कारमूर्ती साधनाताई भोपळे व श्यामशील भोपळे उपस्थित होते.कार्यक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्र राज्य गीताने करण्यात आला. प्रास्ताविकात प्राईम संवादचे कार्यकारी संचालक ॲड.कौंतेय भोपळे यांनी साधनाताई भोपळे यांच्या ३७ वर्षांच्या शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडून सांगितला. विद्यार्थीकेंद्री अध्यापन, सामाजिक बांधिलकी, शिस्तप्रियता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेल्या योगदानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवर, सहकारी शिक्षक-शिक्षिका, नातेवाईक, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून साधनाताई भोपळे यांच्या कार्याचा गौरव केला. शाल, पुष्पगुच्छ ऐवजी विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी साहित्य देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.उत्तरपर भाषणात सौ. साधनाताई भोपळे यांनी सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत शिक्षणसेवेचा वसा पुढेही जपण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविणे हेच शिक्षकाचे खरे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कृतीशील शिक्षक तुळसीदास खिरोडकर यांनी केले, तर प्रा. कौस्तुभ भोपळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी, नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मनीष गिऱ्हे,संतोषकुमार राऊत, निलेश खिरोडकार, अपर्णा आमले, खडसे, यांनी पुढाकार घेतला.
