महावितरणला नागरिकांचा थेट इशारा; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र उपोषणाचा इशारा...
जळगाव जामोद(प्रतिनिधी )
महावितरण कंपनीकडून ग्राहकांची कोणतीही पूर्वसंमती किंवा लेखी परवानगी न घेता त्यांच्या वीज जोडणीवर बळजबरीने 'स्मार्ट मीटर' बसवण्याचा प्रकार जळगाव जामोद येथील अयोध्या नगरमध्ये उघडकीस आला आहे. या मनमानी कारभाराविरोधात संतप्त नागरिकांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना दिनांक २३ जुलै रोजी निवेदन देत आक्रमक भूमिका घेतली असून, त्वरित हे स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पूर्ववत बसवण्याची मागणी केली आहे.निवेदनात नागरिकांनी नमूद केले आहे की, आमच्या सहमतीशिवाय परस्पर नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. या नवीन मीटरमुळे पूर्वीच्या तुलनेत वीज बिलामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून या बिलाबाबत नागरिकांमध्ये तीव्र असमाधान आहे.माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहिती व बातम्यांनुसार, मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले होते की, सामान्य नागरिकांवर बळजबरीने स्मार्ट मीटर लावले जाणार नाहीत. असे असतानाही स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांच्या संमतीशिवाय परस्पर स्मार्ट मीटर बसवल्यामुळे शासनाच्या भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.नागरिकांनी प्रशासनाला खडा सवाल केला आहे की, नेमक्या कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या अधिकाराखाली आमच्या सहमती शिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात आले? याची तात्काळ माहिती द्यावी आणि आमच्या तक्रारीवर नियमानुसार निर्णय घेऊन लवकरात लवकर न्याय द्यावा.जर महावितरण प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेतली नाही, तर नाइलाजास्तव व शांततेच्या मार्गाने तीव्र उपोषण करावे लागेल, असा सज्जड इशारा नागरिकांनी दिला आहे.निवेदन देताना रामकृष्ण वंडाळे, आकाश ताडे, आशीष कोथळकर, वैभव ताडे, गणेश वंडाळे, गोपाल मधुकर ढगे, योगेश नानक्दे, योगेश ताडे, अशोक काळपांडे, स्वप्नील मिसाळ, विशाल धुर्डे, राजेश घोलप, अंकुश हागे, वैभव फुसे, विलास ढगे,हर्शद म्हस्के, विनोद येऊल व इतर अयोध्या नगर, जळगाव जामोद येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
