जळगाव जामोद (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५–२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल, आसलगाव येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत जिल्ह्याच्या शैक्षणिक पटलावर शाळेचा गौरवशाली ठसा उमटवला आहे. या विद्यार्थ्यांच्या दैदिप्यमान यशामुळे आसलगाव परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.या परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर वर्चस्व निर्माण केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:भाग्यश्री कारोडे: जिल्ह्यात प्रथम क्रमांक,कृष्णाली टापरे: जिल्ह्यात तृतीय क्रमांक,आदर्श वानखडे: मागासवर्गीय प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक.विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षक आणि प्रशासनाचे मोलाचे योगदान राहिले आहे. मुख्याध्यापक प्रेमसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत राबविण्यात आलेल्या प्रभावी शैक्षणिक उपक्रमांचा फायदा विद्यार्थ्यांना झाला. तसेच, केंद्रप्रमुख महादेव कुवारे यांचे विशेष मार्गदर्शन आणि सुरेश भोपळे, अनिल भगत व सुचिता जैन या शिक्षकांनी घेतलेली सातत्यपूर्ण मेहनत या यशाची गुरुकिल्ली ठरली आहे."विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे हे फळ आहे. आम्हा सर्वांना आपल्या विद्यार्थ्यांच्या या यशाचा सार्थ अभिमान आहे," असे मुख्याध्यापक प्रेमसिंग राठोड यांनी व्यक्त केले.शाळेच्या या उत्तुंग यशाबद्दल पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस गावकर्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
