जळगाव जामोद (प्रतिनिधी):
"आम्ही आपल्या पगारावर समाधानी असून या कार्यालयामध्ये कोणतीही लाच स्वीकारल्या जात नाही", अशी मोठी पाटी कार्यालयासमोर ठळक अक्षरात लावणारे पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी संदीप कुमार मोरे ह्याला गेल्या १५ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापदा रचून अटक केली. तब्बल आठ दिवस कारागृहात मुक्काम करणाऱ्या विस्तार अधिकारी मोरे ह्याला दिनांक २१ जुलै रोजी सेवेतून निलंबित केल्याचे गटविकास अधिकारी ऐश्वर्या कोरे यांनी सांगितले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचला असून सदर प्रकरणामुळे जिल्हा प्रशासनाची बदनामी झाल्याचे कारण ठेवून मोरे यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. असे त्यांचे निलंबन आदेशात नमूद केले आहे. निलंबन काळात त्यांना लवकरच इतरत्र मुख्यालय देण्यात येईल.अकोला खुर्द येथील ज्ञानेश्वर कवडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संदीप मोरे यांची तक्रार केली होती. पंचायत समिती मधील पंचायत विभागामध्ये अमरावती येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना संदीप मोरे याला अटक केली. ज्ञानेश्वर कवळे, राहुल बघे, धीरज सावरकर,राहुल वानखेडे, भारसाकळे ह्यांनी विविध तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे यापूर्वी केल्या होत्या.
