सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
जलंब जवळच असलेल्या पहुरजिरा येथे अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचे कुलुप व कडी कोंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रकमेसह 4 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला असल्याची घटना दि.8 ऑगस्ट चे मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून याप्रकरणी जलंब पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर या घडलेल्या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जलंब पो.स्टे अंतर्गत येत असलेल्या पहुरजिरा ता.शेगाव येथील रहिवाशी वैभव गजानन भालदाणे हे त्यांच्या राहत्या घरामध्ये कुटुंबासह रात्री हॉलमध्ये झोपलेले असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील बेडरूमचे कडी कोंडा व कुलूप तोडून दोन्ही बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटामध्ये ठेवलेले रोख 2 लाख रुपये व 5 तोळे 50 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत 2 लाख 50 हजार रुपये असा एकूण 4 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.अशी फिर्याद वैभव भालदाणे यांनी जलंब पोस्टेला दिली यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अप नं. 244/2026 कलम 305(अ),331(4) BNS अन्वे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजीव मुंढे,पोहेका राजेश हिवाळे करीत आहे.तर गेल्या 6 महिन्यापासून पहुरजिरा येथे अज्ञात चोरट्याने धुमाकूळ घालत आतापर्यंत जवळपास 5 ते 6 घरे फोडून लाखो रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्यामुळे पहुरजिरा गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अद्याप पर्यंतही एकाही चोरीचा पोलिसांकडून तपास न लावल्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी तीव्र रोष व्यक्त होत असुन जलंब पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे..
