जळगाव जामोद(प्रतिनिधी);
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २३१ व्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाभर संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या संदेश यात्रेच्या अनुषंगाने आदर्श विद्यालय, मानेगाव येथे आमदार डॉ. संजयजी कुटे यांनी विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधत लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला.यावेळी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कु. वैष्णवी आटोळे हिने आमदार संजय कुटे यांच्याशी संवाद साधला.तिच्या धाडसाचे कौतुक करत आमदार कुटे यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आदर्श घेऊन स्वतःमधील आत्मविश्वास वाढवावा आणि भविष्यात समाजाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.“आजची Gen-Z पिढी ऊर्जावान आहे. या पिढीशी संवाद साधून त्यांच्या ऊर्जेचा उपयोग समाजातील विधायक कामांसाठी करून घेणे गरजेचे आहे,” असे आ. कुटे यांनी सांगितले.यावेळी त्यांनी तरुण पिढीमध्ये संस्कार, नैतिकता, नीतिमूल्ये आणि ज्येष्ठ व्यक्तींबद्दलचा आदर अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली.भारताचा दैदिप्यमान इतिहास, संस्कृती आणि संस्कार यांची नव्या पिढीला जाणीव करून देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“थोर महापुरुषांचे विचार या पिढीने अंगीकारले, तर विकसित भारत घडविण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही,” असा विश्वासही आ. कुटे यांनी व्यक्त केला.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तब्बल तीस वर्षे केलेला राज्यकारभार आजही आदर्शवत असल्याचे सांगत आ. कुटे म्हणाले की, त्यांच्या प्रशासनातील सुशासन, लोककल्याणकारी कार्य, राष्ट्रवाद, देशाप्रती असलेला अभिमान आणि जनतेवरील प्रेम हे आजच्या राज्यकर्त्यांसह संपूर्ण समाजासाठी दीपस्तंभासारखे आहेत.अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
