बुलढाणा जिल्हा(प्रतिनिधी);
संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील रहिवासी, कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूरचे विद्यमान संचालक तथा पळशी झाशीचे माजी सरपंच अभयसिंह मनोहर मारोडे यांची इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसी (ISD) आयोजित 'द गुड पॉलिटिशियन २०२६' या प्रतिष्ठित राष्ट्रीय नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. देशभरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात तळागाळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हजारो अर्जदारांमधून निवडलेल्या अवघ्या ५० युवा नेत्यांमध्ये त्यांचा समावेश झाला असून, यावर्षी संपूर्ण विदर्भातून निवड होणारे ते एकमेव युवा नेतृत्व ठरले आहेत.
ही निवड प्रक्रिया जवळपास तीन महिन्यांपर्यंत चालली. यात ऑनलाइन लेख सादरीकरण, व्हिडिओ मुलाखत आणि दोन दिवसीय निवासी बूट कॅम्प अशा विविध टप्प्यांचा समावेश होता. या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी कामगिरी केल्यानंतर अंतिम ५० जणांची निवड करण्यात आली.या नऊ महिन्यांच्या निवासी नेतृत्व विकास कार्यक्रमामध्ये सहभागी युवा नेत्यांना लोकशाही व्यवस्था, संविधानिक मूल्ये, सार्वजनिक धोरणे, निवडणूक प्रक्रिया, प्रभावी नेतृत्व, जनसंवाद, संघटन उभारणी, निवडणूक नियोजन, धोरणनिर्मिती तसेच लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय देशातील विविध राज्यांतील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत युवा नेतृत्वाशी संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि परस्परांकडून शिकण्याची संधीही या कार्यक्रमातून मिळणार आहे.अभयसिंह मारोडे हे यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे माजी प्रवक्ते म्हणून कार्यरत होते. सध्या ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून, मानवता, समता, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, युवकांचे संघटन, शिक्षण तसेच वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य करत आहेत. त्यांच्या या सामाजिक व लोकशाहीवादी कार्याची दखल घेत इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसीने त्यांची राष्ट्रीय नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी निवड केली आहे.अभयसिंह मारोडे यांची ही निवड संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
