रसुलपूरमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष!“शिक्षण घ्या, संस्कृती जपा, निसर्ग वाचवा”चा संदेश; हजारो आदिवासी बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती...


 रसुलपूरमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष!“शिक्षण घ्या, संस्कृती जपा, निसर्ग वाचवा”चा संदेश; हजारो आदिवासी बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती...

जळगाव जामोद(प्रतिनिधी) : 

तालुक्यातील रसुलनपूर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या संस्कृती, परंपरा, हक्क आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.आदिवासी समाज हा निसर्गाचा जिवलग मित्र असून, हजारो वर्षांपासून आदिवासी बांधवांनी निसर्गाच्या सानिध्यात राहून शेती, जंगलातील उत्पन्न, मासेमारी, लोककला आणि पारंपरिक ज्ञानाच्या माध्यमातून आपली जीवनशैली जपली आहे. बोलीभाषा, वेशभूषा, लोकगीते, नृत्य, रूढी-परंपरा आणि प्रथा हीच आदिवासी समाजाची खरी ओळख असल्याचे यावेळी सांगण्यात आले.१९९४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन’ म्हणून घोषित केला. आदिवासी समाजाच्या हक्कांबाबत जनजागृती करणे, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाला चालना देणे आणि त्यांच्या संस्कृती व परंपरांचे संरक्षण करणे हा या दिवसामागील प्रमुख उद्देश आहे.भारताच्या संविधानात आदिवासी समाजाच्या विकासासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असून, आदिवासींची संस्कृती, परंपरा आणि स्वशासन टिकवण्यासाठी पेसा कायद्याचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले. ग्रामसभा ही आदिवासी गावाच्या विकासाची प्रमुख शक्ती असून, स्थानिक संसाधने व जीवनपद्धतीचे संरक्षण करण्याची जबाबदारी ग्रामसभेची असल्याचेही सांगण्यात आले.

“शिक्षण हीच खरी ताकद आहे आणि संस्कृती हीच खरी ओळख आहे. आधुनिक ज्ञान आत्मसात करताना आपल्या मुळांचा विसर पडू देऊ नका. निसर्गाचा सन्मान करा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा,” असा संदेश यावेळी देण्यात आला.“शिक्षण घ्या, संस्कृती जपा, निसर्ग वाचवा… जय जोहार! जय आदिवासी! जय हिंद!” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे बाळू कुटे, परिक्षित ठाकरे, जावेद तडवी, उस्मान तडवी, असलम तडवी, इब्राहिम तडवी, मतीन तडवी, मोहसीन तडवी, हुसेन तडवी, सिताब तडवी, अश्रफ तडवी यांच्यासह लसनपूर येथील संपूर्ण आदिवासी समाजातील हजारो बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा आली.

Previous Post Next Post